पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२५

च्या आरंभापासून जो ध्वनि मनुष्याबरोबर सहचर आहे, तोच ध्वनि चालू क्षणी आमच्याजवळ उमटत आहे. उच्च पर्वतांत उगम पावणाऱ्या झऱ्यासारखा तो ध्वनि आहे. ज्याप्रमाणे तो झरा कित्येक ठिकाणी गुप्त होऊन पुन्हां प्रगट होतो, व मध्यंतरी त्याचे पाणी कोठे कमी झालेले तर कोठे इतर प्रवाह मिळून अधिक झालेले असते, त्याचप्रमाणे हा ध्वनि केव्हां सूक्ष्म तर केव्हां प्रचंड, कधी अगदी गुप्त तर केव्हां पूर्णपणे प्रगट झाला. पर्वताच्या शिखरावर जन्म पावलेला लहानसा झरा ज्याप्रमाणे दुसऱ्या लहान लहान ओढ्यांस आपल्याशी संयुक्त करून घेत घेत शेवटी प्रचंड नदाचे स्वरूप पावतो, त्याचप्रमाणे काळाच्या अनंतत्वांत प्रगट झालेला हा सूक्ष्म ध्वनि सर्व राष्ट्रांतील स्त्रीपुरुषांच्या मुखांतून निघणाऱ्या लहान लहान ध्वनींस आपल्याशी मिळवून घेऊन आतां पूर्णत्वाने प्रगट होऊ पहात आहे. या ध्वनीने जो प्रथम निरोप आणिला तो असा:-'सर्वत्र मित्रभाव, सर्व धर्माचा विजय.' सर्व धर्मातील शत्रुभाव नष्ट होऊन सर्वांचे शेवटी एकीकरण होणार असें या ध्वनीने सूचित केले आहे. या निरोपाचा अर्थ काय हे समजण्याचा आपण प्रयत्न करूं.

 एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी भौतिकशास्त्रांची जी प्रचंड लाट उसळली तिच्या सपाट्यांत सांपडून सर्व धर्म रसातळास जातात की काय अशी भीति वाढू लागली होती. नव्या शास्त्रांनी सुरू केलेल्या घणाच्या तडाक्याखाली जुन्या धर्मकल्पना कांचेच्या भांड्याप्रमाणे कडाकड फुटू लागल्या. धर्म ह्मणजे अर्थशुन्य बडबडीचे पोतडें आहे की काय असें ज्यांस वाढू लागले त्यांची स्थिति अत्यंत अंधकारमय आणि निराशाजनक दिसू लागली. एखाद्या बुळबुळीत पदार्थास अधिक दाबून धरूं लागले असतां तो जसा अधिक सपाट्याने लांब निसटून जातो त्याप्रमाणे एक एक धर्मकल्पना सपाटयाने लांब लांब जाऊं लागली. अज्ञेयवाद आणि चार्वाकमत यांचे प्राबल्य होऊन त्यांच्या हल्ल्याने जुन्या धर्माची इमारत इतकी खिळखिळीत झाली की, ती लवकर जमिनदोस्त होणार अशी चिन्हें उघड दिसू लागली. जे कोणी जुन्या मताचे होते त्यांस आपली मतें बोलून दाखविण्याचेंहि धैर्य होईनासे झाले. आतां जुना धर्म जगणे शक्य नाही अशी बहुतेकांची खात्री झाली होती. परंतु ही स्थिति बदलत जाणार, असे वाढू लागले आहे. हा फरक होण्यास काय कारणे झाली याचा आपण विचार करूं. निरनिराळ्या प्रचलित धर्माचा तुलनात्मक अभ्यास करण्याची प्रवृत्ति वाढू लागली हे पहिले मोठे कारण आहे. मी लहान वयाचा