पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

 होणे अशक्य आहे. ख्रिस्त्यांनी हिंदुधर्म स्वीकारावा अशी इच्छा मी कां करावी, तसेंच हिंदूने अथवा बौद्धानें ख्रिस्ती व्हावें असें तरी मला कां वाटावें ? ईश्वर करो आणि तसे न होवो !" .

 जमिनीत बीजारोपण केलें ह्मणजे त्या बीजाभोंवतीं पृथ्वी, पाणी आणि हवा यांचा पक्का गराडा असतो; ह्मणून पृथ्वी, पाणी आणि हवा यांपैकी कोणत्याहि एका पदार्थाचें रूप त्या बीजास प्राप्त होते काय ? नाही. त्या बीजाचा वृक्षच निर्माण होतो. याचा अर्थ हाच की पूर्वसंकेताने ठरविलेल्या दिशेनेंच त्याची वाढ होते. पृथ्वी, पाणी आणि हवा यांतील पोषक द्रव्ये घेऊन त्यांचे रूपांतर करून, पाने आणि फुलें, तें वीज निर्माण करितं. तसेंच धर्माचेंहि आहे. हिंदूंचे ख्रिस्ती झाले अथवा ख्रिस्त्यांचे हिंदू झाले तर त्यांत कांही फायदा होण्याचा संभव नाही; परंतु एकमेकांच्या सहानुभूतीनें परस्परांत जे चांगले ह्मणून आढळेल तें परस्परांनी घेऊन आपल्या मूळ संस्कारांशी त्याचा एकजीव करून टाकिला पाहिजे. कोणीहि आपले स्वत्व विसरणे फायद्याचे नाही. अंतःकरणाचे पावित्र्य आणि मनौदार्य ही निर्माण करण्याचे सामर्थ्य कोणत्याहि एकाच विशिष्ट धर्मास आंदण दिलेले नाही, ही गोष्ट विशेषेकरून या परिषदेंत निःसंशय सिद्ध होऊन जगाच्या प्रत्ययास आली. अत्युच्च दर्जाची स्त्रीपुरुष सर्व धर्मात निर्माण झालेली आहेत, असा प्रत्यक्ष पुरावा दिसत असूनहि जर आपलाच धर्म तेवढा खरा व जगण्यास योग्य आणि बाकीचे धर्म नष्ट होण्यास योग्य असे कोणास वाटत असेल तर असल्या व्यक्ति केवळ अनुकंपनीय मात्र होत. त्यांस माझें एवढेच सांगणे आहे की “मित्रांनो, इतर धर्म बुडविण्यासाठी तुह्मीं भगिरथ प्रयत्न केला तरी इतःपर 'शांतता, परस्पर मदत, आणि मित्रभाववृद्धि' या त्रिपुटीने अंकित केलेली निशाणे घेऊन सर्व धर्म सारख्याच जोमाने पुढे सरसावणार आहेत."

आत्मा, परमेश्वर आणि धर्म.

 कित्येक शतकांपूर्वी विश्वांत उमटलेला ध्वनि काळाच्या पोटांतून प्रवास करित करित आपणापर्यंत येऊन पोहोचला आहे. निर्जन अरण्यांत आणि हिमाचलाच्या गुहांत वास करणाऱ्या ऋषिवर्यानी पाठविलेला निरोप आपणापयेत येऊन पोहोचला आहे. जो ध्वनि भगवान् बुद्धाच्या मुखांतून बाहेर पडला, जो ध्वनि अनेक वेळां अनेक रूपांनी अनेकांच्या मुखांतून प्रगट झाला, जगा