पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२३

 तात्विकदृष्टया हिंदुधर्म आणि बौद्धधर्म यांचा इतका एकजीव झाला आहे की एकावांचून दुसऱ्यास जिवंत राहणे शक्य नाही. ब्राह्मणांनी पूर्णतेस आणिलेल्या तत्वविचारांचे साहाय्य असल्याशिवाय बौद्धधर्म मृतप्राय होणारच. तसेंच प्राणिमात्रावर दया करणे हा जो बौद्धधर्माचा विशेष त्याचें ब्राह्मणांनी ग्रहण केल्याशिवाय त्यांच्या कोरड्या ब्रह्मज्ञानाचें तेज कसे पडणार ? या दोन धर्मानी निर्माण करून दिलेल्या दोन तत्वांचे एकीकरण कायम होते, तोंवर हिंदुसमाज संस्कृतीच्या अत्युच्च शिखरावर आरूढ झालेला दिसत होता; परंतु दुर्दैवाने ही दोन तत्वे भिन्न झाली आणि हिंदुसमाजाची भव्य इमारत कडाडून पडली. तीस कोटी भिकाऱ्यांनी आज हिंदुस्थान व्यापला आहे याचे कारण ही विभक्तताच. आज हजारों वर्षे वाटेल त्या जेत्याची आर्यभूमि दासी बनून राहिली आहे याचेहि कारण हेच. प्रिय बंधूंनो, इतका वेळ मी सांगितलेली गोष्ट ध्यानांत धरून आपण ब्राह्मणांची तेजस्वी बुद्धिमत्ता आणि बुद्धाचें दया आणि उदार अंत:करण यांचे पुन्हां मिश्रण करूं या.

६. धर्मपरिषदेतील शेवटचे व्याख्यान.

 कल्पनासृष्टीच्या उदरांतून सुरक्षितपणे बाहेर पडून सर्व-धर्मपरिषद् प्रत्यक्ष सृष्टीत अवतरली. ही परिषद् यशस्वी व्हावी ह्मणून ज्यांनी ज्यांनी अहेतुक चित्ताने अत्यंत परिश्रम केले त्यांच्या श्रमांचे दयाळु परमेश्वराने चीज केले. ज्यांच्या उदार अंतःकरणांत या परिषदेची प्रथम कल्पना उद्भवली व ज्यांनी तिला प्रत्यक्ष रूप दिले त्यांचे आभार मानणे उचित आहे. ज्यांनी भाषणे करून आपलें मनौदार्य व्यक्त केले त्यांचेहि आभार मानिले पाहिजेत. माझ्या भाषणाचे कौतुक करून ज्यांनी मला प्रोत्साहन दिले त्या माझ्या प्रिय श्रोतृगणाचेहि मी आभार मानितों. त्याच प्रमाणे प्रसंगास अनुचित अशी भाषणे कोणी केली असलींच तर त्यांचेहि आभार मानणें अवश्य आहे; कारण त्यामुळे तुलनात्मक दृष्टीने उचित भाषणांचें तेज अधिक उज्वलतेने पडण्यास मदतच झाली असें म्हटले पाहिजे.

 सर्व धर्माचे एकीकरण कोणत्या तत्वांवर करता येईल याचा बराच ऊहापोह झाला. मी सध्या काही नवीन उपाय सुचविणार आहे असें नाहीं; परंतु एकाच धर्माचा पूर्ण विजय होऊन बाकीचे धर्म नष्ट व्हावे अशी जर कोणाची इच्छा असेल तर त्यास मला एवढेच सांगावयाचे आहे “ बाबारे, तुझी इच्छा तृप्त