पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

 चरित्रांतील अत्यंत उज्वल आणि रमणीय असा विशेष होय. कित्येक ब्राह्मण त्याचे शिष्य झाले होते. बुद्धाचा जन्म झाला त्यावेळी संस्कृत भाषा प्रचारांतून गेली होती. ती फक्त पुस्तकरूपाने जिवंत राहिली होती. त्याने सांगितलेलें धर्मज्ञान संस्कृतांत ग्रथित करावे अशी त्याच्या ब्राह्मण शिष्यांस इच्छा होऊन तसे करण्यास त्यांनी आपल्या गुरूची परवानगी मागितली. त्यावर बुद्ध ह्मणाला, " माझा जन्म माझ्या गरीब आणि अज्ञान बांधवांसाठी झाला आहे. याकरितां त्यांच्याच भाषेने त्यांस धर्मज्ञान सांगणे मला इष्ट वाटते." यामुळे बौद्धधर्माची बहुतेक पुस्तकें त्या वेळच्या प्रचलित भाषेत लिहिलेली आढळतात.

 तत्ववेत्त्यांनी कोणत्याहि मताचे प्रतिपादन केले अथवा मानसशास्त्रवेत्त्यांनी कोणतेहि सिद्धांत सिद्ध केले, तरी जोपर्यंत मृत्यूचे साम्राज्य या भूतलावर कायम आहे, जोपर्यंत मानवी अंतःकरणांतून भीतीचे समूळ उच्चाटन झाले नाही, आणि जोपर्यंत दुर्बलतेमुळे आपणांस कोणाची तरी मदत असावी ही इच्छा मानवी हृदयांत शिल्लक आहे, तोपर्यंत परमेश्वरावरील भरंवसा जगांतून नष्ट होणारच नाही.

 बुद्धानुयायांनी आपल्या धर्मप्रचाराच्या कार्यात दोन मोठ्या चुका केल्या. वेदांवर हल्ले करून जुन्या इमारतीचा पाया ढासळविण्याचा त्यांनी यत्न केला. परंतु वेदांवर हल्ला करून यश मिळवू पाहणे आणि खडक डोक्याने फोडण्याचा प्रयत्न करणे ही सारख्याच शहाणपणाची कामें आहेत. हीच त्यांची पहिली मोठी चूक झाली. तसेंच सामान्य कर्मसंगी जनतेचा परमेश्वरावरील भरंवस नाहीसा करण्याचा त्यांनी यत्न केला, ही दुसरी मोठी चूक त्यांजकडून घडली. याचा साहजिक परिणाम बौद्धधर्माचा हिंदुस्थानांतून नायनाट झाला हा होय. ज्या देशांत बौद्धधर्माचा जन्म झाला त्याच आर्यावर्तात आपणास बौद्ध ह्मणवून घेणारा एकहि इसम आज सांपडणार नाही! .

 परंतु यामुळे ब्राह्मणी धर्माचें मात्र थोडेंसें नुकसान झाले ही गोष्ट खरी. वौद्धधर्मामुळे खालच्या वर्गात झपाट्याने सुधारणा झाली. लोकांत परस्पर साहानुभूति आणि औदार्य यांची वाढ झाली. त्या वेळच्या एका ग्रीक प्रवाशाने हिंदूंत खोटे बोलणारा कोणी आढळत नाही व परद्वार करणारी अशी एकहि हिंदु स्त्री आढळत नाही, असें वर्णन लिहून ठेविलें आहे. यावरून त्यावेळचा हिंदुसमाज बुद्धाच्या अवतारामुळे किती उच्च पदवीस पोहोंचला होता, याची कल्पना येते. हेच कार्य पूर्वी ब्राह्मणधर्म करित होता; परंतु त्याचे कार्य बुद्धावताराने उचलल्यामुळे तो धर्म कांहीं काल मागे पडला ही गोष्ट खरी.