पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२१

 कसा? त्यावेळी जे बुद्धानुयायी झाले त्यांस बुद्धाचें खरें ज्ञान लाभले नाही, इतकेंच आमचें ह्मणणे आहे. यहुदी धर्म आणि ख्रिस्ती धर्म यांत जें परस्पर नातें आहे तशाच प्रकारचे नातें वैदिक हिंदुधर्म आणि बौद्धधर्म यांमध्ये आहे. येशु ख्रिस्त यहुदी होता. तसाच शाक्यमुनी हिंदु होता. यहुदी लोकांनी येशु ख्रिस्ताचा अत्यंत छळ केला इतकेच नव्हे तर त्यांनी त्यास क्रुसावर खिळून ठार मारिलें; परंतु हिंदूंनी शाक्यमुनी हा अवतार आहे असे मानून त्याचे पूजन केले. शाक्यमुनीने अगदी नवें असें कांही सांगितले नाही; तर वैदिकधर्मतत्वेंच त्याने अधिक स्पष्ट रीतीने प्रगट केली इतकेंच आम्हा हिंदु लोकांचे ह्मणणे आहे. यहुदी धर्म नष्ट करण्याकरितां नव्हे तर तो प्रत्यक्ष आचरून दाखवून त्यांत दिसणाऱ्या उणिवा भरून काढण्याकरितां ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताचा अवतार झाला, त्याच प्रकारच्या कार्यासाठी शाक्यमुनी अवतरला. येशू ख्रिस्ताची खरी ओळख तत्कालीन इतर लोकांस जशी पटली नाही, तशीच बुद्धाची खरी ओळख खुद्द त्याच्या अनुयायांस बरोबर पटली नाही. पूर्वीचा धर्म मोडून टाकून अगदी नव्या धर्माची स्थापना करावी हा बुद्धाच्या अवताराचा हेतु नसून वैदिकधर्माचा प्रत्यक्ष आचार कसा असतो आणि त्याच्या तत्वांना दृश्यस्वरूप कसे द्यावें हे दोखविण्याकरितां बुद्ध अवतरला.

 हिंदुधर्माचे प्रमुख असे दोन भाग आहेत-कर्मकांड आणि ज्ञानकांड. होमहवनादि क्रियांचा विचार कर्मकांडांत प्रधान असून ज्ञानकांडांत तत्वविचार सांगितला आहे. संन्यस्तवृत्तीने राहणारे लोक केवळ ज्ञानकांडाचा विचार करितात.

 या धर्मविचारांत जातिभेदास फांटा दिलेला आहे. अत्यंत उच्च जातीचा अथवा अगदीं नीच जातीचा असा कोणीहि मनुष्य असला तरी त्यागी होण्यास त्यास हिंदुस्थानांत आडकाठी नाही. दोघेहि खरे त्यागी झाले तर त्यांच्यांत कांहींच भेद मानण्यांत येत नाही. धर्ममार्गात जातीचा अथवा वर्णाचा भेद नाही. जात ही केवळ व्यावहारिक आचाराची बाब आहे. शाक्यमुनी स्वतः त्यागी होता. कालांतराने वेदांतील धर्मज्ञान गुप्त झाले होतें तें त्याने पुन्हां उज्वल स्वरूपाने लोकांस दाखविले. अत्यंत कनिष्ट दर्जाच्या मनुष्यापर्यंत हे ज्ञान पसरावे अशा उदार बुद्धीचा तो होता. धर्मप्रचारक तयार करून त्यांच्याकडून धर्मज्ञानाचा लोकांस उपदेश करण्याचा मार्ग बुद्धानेच प्रथम प्रचारांत आणिला.

 प्रत्येक मनुष्याबद्दल, आणि विशेषेकरून प्रत्येक गरीब आणि अज्ञान मनुप्याबद्दल त्याच्या मनांत अनुपमेय प्रेम वसत होते. हाच त्याच्या एकंदर