पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१९

 काळी जर एकधर्म होणे शक्य असेल तर तो कालस्थलाबाधित अशा रूपाचाच असला पाहिजे. त्यांतील तत्वें विशिष्ट स्थली अथवा विशिष्ट कालींच खरी ठरतील अशी नसावी. जाति अथवा वर्ण यांचा यत्किंचितहि भेद मनांत न आणितां सर्वास सारखाच ज्ञानमार्ग दाखविणारा असा तो धर्म असला पाहिजे. तसेच अत्यंत पुण्यवान् अथवा अत्यंत पापी यांस सारखीच दया दाखविणारा तो धर्म असला पाहिजे. ब्राह्मणांचा धर्म, बुद्धाचा धर्म, येशुख्रिस्ताचा धर्म आणि महंमदाचा धर्म या सर्वांचे स्वरूप जेथें आत्यंतिक ऐक्याने नजरेस येईल असा तो धर्म असला पाहिजे. पशूपेक्षां फारसे अधिक श्रेष्ठ नाहीत अशा रानटी लोकांपासून तो परमेश्वरस्वरूपाच्या जवळ जवळ पोहोंचलेल्या मनुष्यापर्यंत सर्वास सारख्याच ममतेने त्याने पोटाशी धरिलें पाहिजे. प्रत्येक मनुष्यांत गुप्तपणे ईश्वरत्व वास करित आहे, हे त्याचे खरे स्वरूप त्याच्या अनुभवास आणणे हेच त्या धर्माचें काम असले पाहिजे. आपण असा धर्म जगास दिलात तर सारे जग आपलें अनुयायी होईल. अशोकाने अशा एकीकरणाचा प्रयत्न केला. परंतु तो एकटया बौद्ध धर्मासच चिकटून राहिला. बादशहा अकबर याने या गोष्टीचा उपक्रम केला होता; परंतु त्याचे प्रमाण अगदीच अल्प होते. हे काम अमेरिकेनेच शेवटास न्यावे असा संकेत दिसतो.

 हिंदूचें ब्रह्म, जरदुष्ट्राचा अहुर-मझद, बौद्धांचा बुद्ध, यहुद्यांचा यशाया आणि ख्रिस्ती लोकांचा आकाशस्थ पिता आपल्या या प्रयत्नास आशीर्वाद देवोत. धर्मकल्पनेचा तारा पूर्वेस उदय पावला व पश्चिमदिशेकडे संक्रमण करूं लागला. केव्हां त्याचा प्रकाश अंधुक तर केव्हां दैदीप्यमान दिसत होता. अशा रीतीने आपला प्रवास संपवून तो पुन्हां पूर्वदिशेकडे येत येत सँपो नदीच्या काठी आला आहे. येथे त्याच्या तेजाची परमावधि झाल्याचे दिसत आहे.

 स्वतंत्रतेची जन्मभूमि जी कोलंबिया तिचा जयजयकार असो! ज्या कोलंबियाने आपले हात आपल्या शेजाऱ्याच्या रक्तांत कधीहि माखले नाहीत, ज्या कोलंबियाने शेजाऱ्यांना लुटून आपले खिसे कधीहि भरले नाहीत त्या कोलंबियाला मानवी कुलाच्या अत्युच्च संस्कृतीत साहेब नौबतीचा मान मिळावा हे योग्यच आहे. शांतताचिन्हांकित जरिपटका घेऊन कोलंबिया आज सर्वे राष्ट्रांच्या आघाडीस चालत आहे ! कोलंबिया, तुझा त्रिवार जयजयकार असो ?