पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

 भटकू नये ह्मणून मूर्तीची योजना आहे. केवळ मूर्ति ह्मणजे परमेश्वर नव्हे, ही गोष्ट आपल्या इतकीच प्रत्येक हिंदूस पक्की ठाऊक आहे. आपण प्रार्थना करितांना 'परमेश्वरा, तूं सर्वव्यापी आहेस' असे म्हणतां याचा वास्तविक अर्थ काय ? आपण अनुभवाने हे म्हणत असतां काय? आकाशाचा अनंत विस्तार अथवा समुद्राचा प्रचंड विस्तार आपल्या मनांत त्या वेळी येत नाही काय? ह्मणजे सर्वव्यापी या शब्दाचे हे मूर्तरूपच झाले नाही काय?

 वास्तविक विचार केला तर यांत मनुष्यस्वभावास विसदृश असें कांहीं नाहीं, हे आपल्या ध्यानात येईल. आमच्या मनोभूमिकेची रचनाच अशी आहे की कोणत्या तरी दृश्य पदार्थाशी जोडल्याशिवाय केवळ गुणांचे चिंतन आम्हास करितांच येत नाही. मग तो दृश्य पदार्थ समुद्र असो, आकाश असो, अग्नि असो, ख्रिस्ति देउळ असो, क्रूसचिन्ह असो, अगर मशीद असो. ईश्वरविषयक सर्व उच्च कल्पना हिंदूंनी आपल्या विशेष प्रकारच्या मूर्तीशी जोडल्या आहेत इतकेंच. आपण निराकाराची स्तुति करतों ह्मणून मोठ्या आढ्यतेने इतरांस तुच्छ समजणारे लोक अद्यापि देवळाच्या चारी भिंतींच्या आंतच कोंडले असल्यासारखे दिसतात. त्यांची अत्यंत मोठी कल्पना पटली तर आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांस मदत करावी इतकीच दिसते. मनुष्याला प्रत्यक्ष परमेश्वर होणे शक्य आहे या कल्पनेचा नुसता स्पर्शहि त्यांस झाल्याचे दिसत नाही. मूर्तिपूजकांची मुख्य कल्पना ह्मटली तर स्वयमेव परमेश्वर होण्याची आहे. एखादें देऊळ, एखादी मूर्ति अथवा एखादें पुस्तक ही केवळ साधनरूप आहेत. यांच्या सहाय्याने एकेका कल्पनेचा ग्रास करून शेवटी परमात्म्याची भेट घ्यावयाची आहे ही गोष्ट हिंदुमात्रास ठाऊक आहे. अमुक मतें संमत आहेत असें म्हटले ह्मणजे धार्मिक जीवनाचा परमावधि झाला असें कोणाहि हिंदूस वाटत नाही. परमेश्वराची भेट होईपर्यंत मध्ये कोठे थांबण्यास जागाच नाहीं असें त्यास वाटते. बाह्योपचारांनी मूर्तिपूजा करणे ही अगदी शेवटची पायरी आहे. प्रार्थना ही दुसरी पायरी आहे, आणि स्वतः परमेश्वर होणे हे मुक्कामास पोहोचणे आहे असें श्रुतींनीहि सांगितले आहे. एखादा मूर्तिपूजक आपल्या मूर्तीपुढे बसला असतां ह्मणतो “ सूर्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश, ताऱ्याचा प्रकाश अथवा अग्नीचा प्रकाश यांपैकी एकहि तुला दाखवू शकत नाही. हे सर्व तुझ्या प्रकाशाने प्रकाशतात." ते स्वतः मूर्तिपूजक असले तरी दुसऱ्या कोणी दुसऱ्या पद्धतीने पूजा केली असता त्यांस पापी समजत नाहीत, अगर त्यांचा पूजनमार्ग खोटा