पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१५

गुलाबाला निरनिराळी अनेक नांवें दिल्याने त्याच्या सुवासांत कांही उणीव येते काय ? नुसती निराळी नांवे देणे याचा अर्थ निराळे मत प्रतिपादन करणे असा होत नाही.

 माझ्या लहानपणी एक ख्रिस्ति उपदेशक एका लहानशा जमावापुढें व्याख्यान देत असतां तेथील मंडळीस उद्देशून ह्मणाला, “ अहो, जर मी तुमच्या मूर्तीवर माझी काठी मारून ती मूर्ती फोडून टाकिली तर ती माझं काय वांकडे करणार आहे ? ” यावर मंडळींतील एकाने त्या पायास उलट प्रश्न विचारिला, “पाद्रीबुवा, तुमच्या आकाशांतील बापाला जर मी शिव्या दिल्या तर तो तरी माझें काय करील? ” पाद्री ह्मणाला, “ तूं मेल्यावर तो तुला शासन करील." हिंदूनें यावर ह्मटलें “तूं मेलास ह्मणजे माझी मूर्ति तुला शासन करील."

 ज्यांना तुह्मी खिस्तिलोक मूर्तिपूजक असें ह्मणतां आणि मूर्तिपूजा ह्मणजे पापाचा मार्ग समजतां त्याच मूर्तिपूजकांत अत्यंत पवित्र असे महात्मे मी पाहिले आहेत. इतकी पवित्रता माझ्या अवलोकनांत दुसऱ्या कोठेहि आली नाही. असे असतां मूर्तिपूजा ह्मणजे पापाचा मार्ग हे शब्द उच्चारतांना बराच विचार करावा लागेल. पापांतून अत्यंत पावित्र्याची उत्पत्ति शक्य आहे काय, याचा तुह्मींच विचार करा.

 धर्मभोळेपणा हा मनुष्याच्या उन्नतीच्या आड येणारा शत्रु आहे, ही गोष्ट मी कबूल करितो; परंतु धर्मवेड हा त्याहूनहि भयंकर शत्रु नाही काय ? ख्रिस्ती मनुष्याला प्रार्थनेसाठी देऊळच कशास पाहिजे ? क्रुसाच्या खुणेत पवित्रता कशी आली ? प्रार्थना करितांना आकाशाकडे डोळे लावण्याची काय गरज आहे ? जुन्या क्याथोलिकपंथाच्या ख्रिस्त्यांस अनेक मूर्तीची आवश्यकता कां वाटली ? परमेश्वराचें गुणवर्णन करितांना प्रॉटेस्टंट ख्रिस्ति अनेक मूर्तीची कल्पना मनांत आणितात ती कां ? माझ्या प्रिय बंधूंनो, श्वासोछास केल्यावांचून जगणे जसे अशक्य तसे कोणत्याना कोणत्या तरी रूपाने गुणांची मानसिक मूर्ति उत्पन्न केल्याशिवाय त्या गुणांचे चिंतन करणे अशक्य आहे. आपले चित्त केवळ निराकारांत लीन होत असल्याचा आपणास केव्हांहि अनुभव येत नाही. आपणास चोहोंकडे जडविषय आणि गुण यांची संलग्न अवस्था पाहण्याची संवय लागलेली आहे. यामुळे जडविषय मनांत आणल्यावांचून गुण अथवा गुणावांचून जडविषय यांचे चिंतन करणे आपणांस शक्य नाही. याच तत्वावर हिंदूंनी मूर्तिरूपानें गुणांना दृश्यस्वरूप दिले आहे. मूर्ति या गुणांचे स्मरण करून देणाऱ्या खुणा आहेत. सद्गुणैकमूर्ती-परमेश्वरा-कडे चित्त लागावें आणि ते इकडे तिकडे