पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

 आत्मा-स्वतंत्र आहे, विश्वचैतन्याहून निराळा आहे असे मी कसें ह्मणावें ? आणि हाच अद्वैत सिद्धांत वेदांतमताने प्रतिपादिला आहे.

 प्रत्येक शास्त्राचे अंतिम साध्य पाहिले तर एक मूलतत्व शोधून काढण्याचे आहे. हे मूळचे तत्व सांपडले की त्या शास्त्राची पुढली गति बंद झालीच पाहिजे; कारण मग तें शास्त्र पूर्णत्वास पोहोचले. पृथ्वीवर अनेकविध दिसणारे पदार्थ एकाच पदार्थापासून निर्माण करता येऊ लागले तर रसायनशास्त्राची प्रगति खुंटणार नाही काय? तसेंच विश्वांत अनेकविध रीतींनी प्रत्ययास येणाऱ्या शक्ती एका मूलशक्तीचीच अनंत रूपं आहेत असे सिद्ध झाले तर पदार्थविज्ञानशास्त्राची (Physics) प्रगति बंद झालीच पाहिजे. तसेंच मृत्यूचे साम्राज्य सर्वत्र अनुभवास येत असतां सदोदित राहणारे चैतन्य सांपडलें की धर्माची वाढहि संपलीच पाहिजे. प्रत्येक क्षणीं बदलत जाणाऱ्या विश्वाचें मूळ स्वरूप शोधून काढणे, अनंत रूपांनी दिसणारे जीवात्मे एकाच विश्वात्म्याची भ्रामक अशी अनंत रूपं आहेत हे सिद्ध करणे, सृष्टीच्या अनंत दृश्य रूपांत वास्तविक एकरूप पाहणे हे धर्माचें अंतिम साध्य. आहे. हे साधलें झणजे धर्मशास्त्राचा शेवटच झाला. त्यापुढे धर्मशास्त्र जाऊंच शकणार नाही. केव्हांना केव्हां तरी सर्व शास्त्रांस हा सिद्धांत मान्य करावाच लागेल.

 कशाचाहि नाश होत नाही आणि अगदी नवें असें कांहीं निर्माणहि होत नाही, असा अलीकडील शास्त्रांचा शोध आहे. हीच गोष्ट आर्यांच्या भाषेत सांगावयाची ह्मणजे 'धाता यथा पूर्वमकल्पयत्' या शब्दांनी सांगतां येईल. आपण कित्येक शतकें-सहस्रकें-जी गोष्ट आपली ह्मणून उराशी बाळगिली तिची सत्यता अधिक स्पष्टपणाने आणि दृश्य अनुभवाच्या शास्त्रांनी सिद्ध होत आहे, हे पाहून आह्मां हिंदूंस आनंदाचे आणि अभिमानाचे भरतें आलें तर त्यांत नवल नाही.

 येथवर तुह्मांस हिंदूधर्माच्या अत्यंत उज्वल अशा स्वरूपाची माहिती दिली. आतां हिंदूंतील अज्ञजनसमूहाच्या धर्मकल्पनांकडे वळू. हिंदुस्थानांत अनेक देवांची कल्पना अस्तित्वात नाही हे आरंभीच आपणांस सांगणे इष्ट आहे. जर आपण थोडा वेळ एखाद्या देवळांत उभे राहिलों आणि तेथील पूजेचा विधि लक्ष्यपूर्वक पाहिला तर तेथील इष्टदेवतेची स्तुति करतांना सर्वसाक्षित्वादि जे गुण परमात्म्यास लाविले आहेत त्याच गुणांची योजना तेथील भक्त आपल्या इष्ट देवतेवर करित असल्याचे आपणास आढळून येईल. जर अशी स्थिति आहे तर हिंदुस्थानांत अनेक देव मानण्यांत येतात, या ह्मणण्यांत काय तात्पर्य आहे ?