पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१३

 आहे. निरनिराळ्या पंथांस सामान्यत्वेकरून संमत झालेली अशी तत्वे येथवर सांगितली; परंतु पूर्णत्व' हे भिन्न भिन्न रूपाचे असणे शक्य नाही. तें दोन अथवा तीन रूपांनी अस्तित्वात येणे शक्य नाही. पूर्णत्व हे नेहमी एकच असूं शकेल. तसेच त्याला काही विशिष्ट गुणधर्म असणेहि संभवत नाही. याकरितां जीवात्मा पूर्णत्व पावला ह्मणजे पूर्णरूप जें ब्रह्म त्या ब्रह्माशी त्याचे ऐक्य होते. येथे आपण स्वतः पूर्णरूप आहों-सच्चिदानंदरूप आहों-असा जीवात्म्यास अनुभव येतो. आपलें व्यक्तित्व नाहीसे होणे ह्मणजे काष्ठलोष्टवत् होण्यासारखें आहे असे कित्येकांस वाटते. परंतु तरवारीचा घाव सोसला नाही अशा क्लीबाने धारातीर्थी स्नान करणाऱ्या वीरपुरुषाच्या अंगावरील जखमांची थट्टा करावी यांत नवल नाही. आपणास मी त्रिवार बजावून सांगतों की, ब्रह्मरूप होणे ह्मणजे काष्ठलोष्टवत् होणे नव्हे. आपल्या या एकाच देहांत अनुभवास येण्याऱ्या चैतन्याचा सुखास्वाद किती आहे हे आपण प्रत्यही अनुभवितो. जर दोनतीन देहांतील चैतन्यरस एकाच देहांत आपणास अनुभवितां येईल तर नेहमीपेक्षा दुप्पट तिप्पट आनंदाचा अनुभव आपणांस होईल. मग या साऱ्या दृश्य विश्वांतील चैतन्यरसांत बुडून जाणे किंबहुना तो चैतन्यरसच आपण होऊन जाणे ह्मणजे कशी स्थिति असेल याची कल्पना करणे आपणावरच सोंपवितों.

 जर आपण स्वतः विश्वरूप व्हावे असे वाटत असेल तर आपल्या या क्षुद्र देहांतील 'स्वत्व' आपणांस विसरण्यावांचून गत्यंतर नाही हे उघड आहे. मला मृत्यूच्या जडत्वापलीकडे जावयाचे असेल तर स्वत: केवळ चैतन्यरूप झाले पाहिजे. दुःखाचे वारें लागू नये अशी माझी इच्छा असेल तर मला स्वतःच सुखरूप झाले पाहिजे. कोणतेंहि अज्ञान माझ्या ठिकाणी संभवू नये अशी माझी इच्छा असेल तर मला स्वत:ला ज्ञानरूप झाले पाहिजे. ही जी विचारपरंपरा मी सांगितली ती तर्कशास्त्रासही पूर्णपणे संमत अशीच आहे. सांप्रत जें शरीर मी धारण करितों तें कायम स्वरूपाचे नसून प्रत्येक क्षणी बदलत आहे नवें होत आहे-असें आज भौतिक शास्त्रे मला सांगतात. हे शरीरहि कायमचें माझें एकट्याचे नसून त्यांत होणाऱ्या फेरबदलावर माझी सत्ता नाही; त्याला स्वतंत्र असें अस्तित्व नसून विश्वांतील अनंत दृश्य आकारांतील तो एक घटक आहे आणि ह्मणून त्याचे कांहीं काल अनुभवास येणारे स्वतंत्र अस्तित्व स्वप्नरूप आहे असें अर्वाचीन शास्त्रे मला मोकळ्या मनाने सांगत आहेत. माझें शरीर जर स्वतंत्रपणे माझें नव्हे हे सिद्ध झाले आहे तर माझें चैतन्य-माझा