पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


 आत्मा हा पूर्ण ईश्वररूप असून जड शरीराने बद्ध असल्यासारखा दिसतो. हा पाश तुटला ह्मणजे आत्मा मुक्त होतो. मुक्त होतो याचा अर्थ जन्ममरण, दुःखपरंपरा आणि अपूर्णता यांतून तो सुटतो, असें वेदांचे सांगणे आहे. परमेश्वराच्या कृपेवांचून मुक्तीची साधने उपलब्ध होणे शक्य नाही. आणि आपण अत्यंत पवित्र झाल्यावांचून परमेश्वराची कृपा होणे शक्य नाही. त्याच्या या कृपेचे स्वरूप ह्मणजे शुद्ध अंत:करणांत परमेश्वर स्वतः उदय पावतो. जे शरीर पूर्वी आपणास केवळ जड, त्याज्य-मृत्पिड-वाटत होते त्याच शरीरांत परमेश्वराचा उदय होतो. अंतःकरणांतील सर्व बरे वाईट विकार लय पावतात. कसल्याहि प्रकारच्या शंका उदय पावत नाहीत. ज्याच्या हृदयांत परमेश्वर उदय पावतो तो जन्ममरणाच्या कारणपरंपरेतून कायमचा बाहेर पडतो. हिंदुधर्माचें सार या एका कल्पनेत सांठविले आहे असें म्हटल्यास फारसें वावगे होणार नाही. केवळ कल्पनेची चित्रे पाहून आणि शब्द ऐकून हिंदूंचे कधीहि समाधान होणार नाही. आमच्या दशविध इंद्रियांच्या आटोक्या बाहेर असाणारा कोणी प्राणि असला तर तो प्रत्यक्ष नजरेस पडला पाहिजे असा हिंदूंचा हट्ट आहे. जर जड सृष्टीच्या बाहेर असणारा केवळ चैतन्यात्मक असा कोणी असेल तर कोणाच्याहि मध्यस्थीवांचून त्याची भेट घेण्यासाठी हिंदु धडपड करितील. जर एखादा खरा हिंदु साधू आपणास भेटला आणि आपण त्यास विचारिलें की "बावाजी, परमेश्वर आहे हे खरें कशावरून ? " तर त्यावर तो उत्तर देईल की “ माझ्या मुला, मी त्याला प्रत्यक्ष पाहिले आहे. त्याची आणि माझी भेट झाली आहे." असे स्पष्टपणे सांगणारा मनुष्यच पूर्णत्वास पोहोचला असे समजावयाचें. अमुक एक मत खरें मानावें, अथवा अमूक एक सिद्धांत खरा समजावा असें हिंदुधर्म कधीहि सांगत नाही. 'आह्मी जें कांहीं ह्मणतो, त्याचा तूं स्वतः अनुभव घे, किंबहुना तेंच तूं स्वतः हो' असें आमच्या ऋषींचे सांगणे आहे. याप्रमाणे धर्ममार्गात जे जे प्रयत्न ऋषींनी केले त्यांचा अंतिम हेतु मनुष्याने स्वत:च्या एकांतिक परिश्रमानें पूर्णत्व पावावें, अत्यंत पवित्र व्हावें-परमेश्वर व्हावें-असा आहे. ख्रिस्तीधर्मातील आकाशस्थ पित्याची जी कल्पना आहे ती कल्पना स्वत:चे ठिकाणीच खरी करणे हे हिंदुधर्माचें अंतिम साध्य आहे. पूर्णत्व पावलेल्या योग्याची स्थिति कशी असते ह्मणाल तर तो पूर्णानंदाच्या स्थितीत सर्वकाल असतो. सर्व सुखाचें माहेरघर जो परमेश्वर त्याच्या सान्निध्यांत दु:खाचा स्पर्शहि होणे शक्य नाही. येथपर्यंत हिंदुतत्वज्ञानांतील निरनिराळ्या पंथांच्या आचार्याची एकवाक्यता