पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

११


सदैव इतकें प्रेम करणे, की त्याहून या जन्मी अथवा जन्मांतरी अन्य कांहींच प्रिय नाही अशी उत्कट भावना ठेवणे हाच या स्वरूपाच्या पूजनाचा मार्ग आहे. हा मार्ग भगवान् श्रीकृष्णांनी पूर्णत्वाने व्यक्त करून दाखविला आहे. श्रीकृष्ण हे प्रत्यक्ष परमेश्वरच मानवस्वरूपाने पृथ्वीवर आले, असा आमचा समज आहे. ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यांत असते त्याप्रमाणे मनुष्याने जगांत राहावें असें भगवानांनी सांगितले आहे. कमळाचें पान पाण्यांत असतांहि जसें ओले होत नाही तसे जगांत सर्व कमें करित असतांहि त्यांपासून उद्भवणाऱ्या सुखदु:खांतून निराळे राहावें. हाताने कर्म घडत असतां मनानें परमेशचिंतन करावे असा भगवान् श्रीकृष्णांचा उपदेश आहे.

 या जगांत आपलें बरें व्हावें अशा इच्छेनें परमेश्वराचे भजन पूजन करणे वावगे नाही; परंतु अत्यंत निरिच्छ मनाने केवळ त्याच्याच प्राप्तीसाठी त्याच्यावर निर्व्याज प्रेम करावें हें अधिक चांगले नाही काय?

“ न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो ॥
हेचि माझी वाणी मज उपदेशी । आणिकां लोकांसी हेंचि सांगे ॥
विटंबो शरीर होत कां विपत्ति । परि राहो चित्तीं पांडुरंग ॥"

हीच प्रार्थना आपण सदोदित करित असले पाहिजे.

 भगवान् श्रीकृष्णाचा युधिष्ठिर नांवाचा भक्त होता. तो समस्त आर्यावर्ताचा राजा होता. त्याच्या भाऊबंदांनी त्याचे सर्वस्व हरण करून त्यास वनवासास धाडिलें. तो हिमालयाच्या आसमंतात् असलेल्या एका वनप्रदेशांत राहिला असतां एकदां त्याच्या राणीने त्यास विचारले, “ महाराज, आपण परमेश्वराचे अनन्य भक्त असतां आपणावर मोठमोठी संकट कोसळतात हे कसे ?” युधिष्ठिराने उत्तर दिले, “ देवि, मी या हिमालयाची उतुंग आणि रमणीय शिखरे पाहून त्यांवर प्रेम करितो. असे करण्यांत त्या पर्वतराजापासून काही प्राप्त करून घेण्याची माझी अपेक्षा आहे काय ? सुंदर आणि उदात्त स्वरूपाची वस्तू नजरेस पडल्यावर तिजवर प्रेम करावे असा माझा स्वभावच आहे. तसेंच जो सर्व सौंदर्याचा निधि आणि उदात्ततेचा परमावधि त्यावर प्रेम केल्याशिवाय माझ्याने कसें राहवेल बरें ! जगांत प्रेमास योग्य असें तें एकच स्थान आहे. या माझ्या प्रेमाच्या मोबदल्यांत मी कशाचीहि अपेक्षा करित नाही. त्याची मर्जी असेल तसे त्याने मला ठेवावें. माझें त्याजवरील प्रेम अगदी निर्व्याज आहे. प्रेम ही गूळखोबऱ्यासारखी क्रयविक्रयाची वस्तु आहे काय ? "