पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


एक प्रश्न उद्भवतो. प्रचंड वादळांत ज्याप्रमाणे एखादी नौका सांपडावी व एका क्षणी पर्वताइतक्या उंच लाटेच्या शिखरावर तर दुसऱ्या क्षणी अत्यंत खोल अशा डोहाच्या तळाशी लोटली जावी अशाच प्रकारच्या स्थितींत मनुष्याचा जीवात्मा सांपडला आहे काय ? त्या नौकेला ज्याप्रमाणे जवळपास कोठेहि आधार ह्मणून दिसत नाही, त्याचप्रमाणे या प्रचंड संसारचक्रांतून सुटण्यास काहींच उपाय नाही काय? कारण आणि कार्य या द्वयीचा तडाखा असा प्रचंड आहे की, त्यांतून कोणीहि सुरक्षितपणे बाहेर पडतोसें दिसत नाही. कालचक्र इतक्या जोराने आणि निर्दयतेने फिरतांना दिसतें की, त्यांत निराश्रित विधवा, पोरकी पोरें आणि उन्मत्त सत्ताधीश एकसारख्या प्रमाणानेच चिरडले जातात. या प्रचंड संसारचक्राची नुसती कल्पनाहि भयजनक आहे. अशा वेळी सृष्टींतून अत्यंत करुणाजनक आवाज निघाला की यांतून सुटण्यास मार्ग नाही काय? या प्रश्नास वेदरूपी उत्तर आले की “ बाळांनो, भिऊ नका. तुह्मीं सच्चिदानंदरूपच आहां. ज्या मूळ सनातन -प्राचीन-रूपांतून तुमचा उद्भव झाला आहे त्याचे ज्ञान तुह्मांस झाले ह्मणजे या जन्ममरणाच्या फेऱ्यांतून तुह्मीं मुक्त व्हाल. माझ्या अमेरिकन भगिनिबंधूंनो, ' सच्चिदानंदाची अपत्ये ' हे नांवच किती मनोहर आहे ! अहाहा ! आपण पापी असें तुह्मी आजवर ऐकत होतां परंतु तुमचे हिंदुबांधव आज तुह्मास पुण्यात्मे ह्मणून हांका मारित आहेत. तुह्मी पापी असें तुमचे हिंदु बांधव तुह्मास कधी स्वप्नांतहि ह्मणणार नाहीत. तुह्मीं पूर्ण आहां, अत्यंत पवित्र आणि पूर्णानंदरूप आहां असें ते तुह्मांस सांगत आहेत. तुह्मांला पापी कोण ह्मणेल ? तुह्मी पापी असे शब्द उच्चारणे हेच महापाप आहे. सिंहाच्या बच्चांनो, उठा, जागे व्हा. आपण मेंढया आहोत असें तुह्मीं स्वप्नांत बरळत आहां. तुह्मीं जड शरीर नव्हत. शरीर हे तुमच्या नोकरासारखे आहे. तुह्मी नित्य, शुद्ध, बुद्ध आणि मुक्त आहां.

 सृष्टीच्या कायद्याच्या तडाक्यांतून सुटण्यास मार्ग नाही असें वेद सांगत नाहींत. हे सर्व कायदे ज्याच्या अनुरोधाने चालतात आणि जे सर्व जड आणि चैतन्ययुक्त पदार्थांस व्यापून उरलें आहे, ज्याच्या हुकमाने वारा वाहतो, अग्नि दहन करितो, मेघ वर्षाव करितात आणि मृत्यु हरण करितो असें सर्वव्यापी आणि सवहिन निराळे असें एक महत्तत्व आहे. “ तूंच आमचा पिता, तूंच आमची माता, तूंच आमचा सखा, तूंच सर्व शक्तीचे अधिष्ठान ह्मणून शक्तीसाठी तुझी आह्मी याचना करितो. या विश्वाचे ओझें तूं वाहतोस. आह्मांस जीविताचे ओझें वाहण्यास सामर्थ्य दे ” असें ऋषींनी या तत्वाचे वर्णन केले आहे. या स्वरूपावर