पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.


आत्मा अच्छेद्य, अदाह्य, अक्लेद्य आणि अशोध्य आहे अशी आह्मां हिंदूंची कल्पना आहे. ह्मणजे तो तरवारीने तुटत नाहीं, विस्तवाने जळत नाही, पाण्याने भिजत नाही आणि वाऱ्याने कोरडा होत नाही. असें आह्मीं समजतो. प्रत्येक जीवात्मा ह्मणजे एक वर्तुळ. त्या वर्तुळाचा परिघ निश्चित नाही, परंतु त्या त्या वेळेपुरता त्याचा मध्यबिंदु मात्र शरीरांत असतो, व मृत्यु ह्मणजे हा बिंदु एका शरीरांतून दुसऱ्या शरीरांत जातो असें प्रत्येक हिंदुमनुष्य समजतो. तसेंच तो जडपदार्थाच्या संगाने बांधला जात नाही. तो अत्यंत शुद्ध, बुद्ध, मुक्त आणि पूर्ण असा आहे; परंतु काही कारणानें तो जडपदार्थाशी संयोग पावतो व भ्रमाने 'मी जडपदार्थ आहे' अशी भावना करितो.

 जर आत्मा नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त आणि पूर्ण असा आहे तर तो जडपदार्थानी पक्का बांधला गेल्यासारखा कां दिसतो असा प्रश्न येथे ओघानेच उद्भवतो. पूर्ण ज्ञानरूप आत्म्यास 'मी अपूर्ण आहे' असा भ्रम तरी का होतो ? या प्रश्नाचे उत्तर देण्यास हिंदु तत्त्ववेत्ता कचरतो असे कोणी ह्मणतात. कित्येकांनी हिंदु अद्वैत सिद्धांताच्या जागी द्वैतादि अनेक प्रकारच्या कल्पनांनी हे प्रश्न सोडविण्याची खटपट केली आहे; परंतु वरील प्रश्नाचे समर्पक उत्तर कोणीहि दिले नाही. या प्रश्नासंबंधानें हिंदुतत्त्ववेत्ता सरळ उत्तर देतो की अत्यंत पूर्णावस्थेतला आत्मा स्वतःस अपूर्ण व जड कां कल्पितो, याचे कारण मला सांगता येत नाही. त्याला उत्तर देतां आलें अथवा न आले तरी त्याच्याशी आपणास प्रस्तुत कांहीं करावयाचें नाही. आपण कोण या प्रश्नाचे उत्तर आपण ह्मणजे देह असें प्रत्येकजण प्रत्येक क्षणी देत असतो. हा आपला नेहमींचा अनुभवच आहे. ' परमेश्वराची तशी मर्जी ' असेंहि उत्तर कोणी कोणी देतात. परंतु वस्तुतः ‘ मला ठाऊक नाही.' या उत्तरांत आणि ' ईश्वराची मर्जी ' या उत्तरांत फारसा भेद नाही. असो.

 जीवात्मा नित्य आणि पूर्ण आहे व मृत्यु ह्मणजे त्याच्या निवासस्थानाचा बदल होण्याशिवाय अधिक काही नाही, असा हिंदुशास्त्राचा सिद्धांत आहे. पूर्वजन्मी केलेल्या कर्माचा परिपाक फलरूपाने आपण या जन्मी भोगित असतो; आणि वर्तमान अथवा चालू कर्माने पुढील जन्माची तयारी आपण करित असतो, असाहि आमचा सिद्धांत आहे. या रीतीने जीवात्मा स्वतःच्या कर्मानुरोधाने पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या अथवा अधिक वाईट अवस्थेत जात असतो. आतां येथे आणखीहि