पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


 प्रत्येक प्राण्याच्या शरीरावर आनुवंशिक संस्कारांची उघड चिन्हें दिसतात ही गोष्ट आपणांस नाकबूल करता येणार नाहीं; तथापि ही चिन्हें केवळ बाह्यस्वरूपाच्या विशिष्टतेची दर्शक असतात. याशिवाय अंतःस्वरूपाची निदर्शक अशी निराळी चिन्हें प्रत्येक जीवात्म्यास असतात. ही चिन्हें त्याच्या पूर्वकर्मानुसार उत्पन्न झालेली असतात. आणि पूर्वी जी इच्छा केली ती फलद्रूप करण्यास योग्य अशा शरीराचा आत्मा स्वीकार करितो.

 अनंत कालाच्या संवयीने प्राण्याच्या शरीररचनेत बदल होतो, ही गोष्ट अर्वाचीन शास्त्रांसहि संमत आहे. आणि अनेकवेळां एक गोष्ट पुनःपुनः करण्यामुळे संवय लागते. यामुळे जन्मतःच कित्येक प्राण्यांस असलेल्या ज्या संवयी आढळून येतात त्या, त्याने पूर्वी अनेक जन्मी पुनःपुनः केलेल्या कर्मामुळे उत्पन्न झालेल्या असतात. या जन्मी त्याने त्या संवयी आपणांस नवीन लावून घेतल्याचा दाखला नसतो. ह्मणून त्या पूर्वजन्मांतरीच्या असल्या पाहिजेत असें मानणे भाग पडते.

 'आपण म्हणतां त्या सर्व गोष्टी गृहित धरल्या तर माझ्या अनेक जन्मांपैकी एकाचेंहि मला स्मरण नाही हे कसें ' अशी कोणी शंका काढिली तर तिचें समाधान करणे फारसें कठिण नाही. मी यावेळी इंग्रजी भाषा बोलत आहे. ही माझी जन्मभाषा नव्हे. तरी माझ्या मनांत यावेळी माझ्या जन्मभाषेचा एकहि शब्द येत नाही. ह्मणजे चालूक्षणी माझी जन्मभाषा मी विसरलों असें झालें आहे. परंतु माझी जन्मभाषा मला आठवावी इतकी नुसती इच्छा मी केली की, शब्दामागे शब्द येऊन माझ्या चित्तांत एकच गर्दी करून सोडतात. यावरून आठवण अथवा स्मृति, ही माझ्या चैतन्यसमुद्राच्या पृष्ठभागावरील एक तरंग आहे. त्या समुद्राच्या पोटांत अनेक वस्तू सांठविलेल्या आहेत. तुह्मी भगिरथ प्रयत्नांनी आपली इच्छा तितकी शक्तिमती केली तर या समुद्राच्या पोटांत तळापर्यंत शिरून पूर्वीचे अनेक जन्म पाहणे ही मोठीशी अवघड गोष्ट नाही.

 कोणत्याहि गोष्टीचा अनुभव होणे हा तिच्या सिद्धीचा प्रत्यक्ष आणि सरळ मार्ग आहे. अमुक तत्वविचार खरा आहे हे प्रत्यक्ष अनुभवानेच नि:संशय पटते. आह्मीं काय ह्मणतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहा असे आमच्या ऋषिवर्गाने साऱ्या जगास मुक्तकंठाने आव्हान केले आहे. आपल्या चैतन्यसमुद्रात बुडी कशी मारावी आणि दम न कोंडतां तळापर्यंत प्रवेश करून तेथील कोश कसा हस्तगत करावा ही गुरुकिल्ली आह्मांपाशी आहे.