पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

 जसा 'मी' भविष्यकाळीं सदोदित राहणार तसाच गतकालींहि 'मी' होतोच. आत्मा हा कोणी निर्माण केलेला नव्हे. कारण, उत्पन्न करणे या शब्दांतच मिश्रण करणे या कल्पनेचा अंतर्भाव होतो. आणि आज जो पदार्थ मिश्रस्थितीत आहे, त्यांतील घटक कालांतराने भिन्न होणार हा नियम आहे. ह्मणजे आत्मा जर कोणी नवा उत्पन्न केलेला असता, तर तोहि केव्हां तरी खचित मेला असता. कित्येक जन्मतःच सुखी असतात. कित्येकांची शरीरसंपत्ति जन्मत:च चांगली असते. त्यांस कशाची कधीहि वाण पडत नाही. कित्येक जन्मतःच दुःखी-कष्टी असतात. कित्येक जन्मतःच लंगडेलुले असतात. कित्येक जन्मतःच वेडे असतात आणि देहपातापर्यंत कसेंबसें आयुष्य कंठित असतात. जर या सर्वांचा उत्पन्नकर्ता कोणी एकच असेल तर असा भेद का हा प्रश्न साहजिक उद्भवतो. परमेश्वर जर न्यायी आणि दयाशील ह्मणवितो तर त्याने उत्पन्न केलेल्या पदार्थात इतकें जमीनअस्मानाचे अंतर कां दिसावें ? बरें, आज जे दुःखी आहेत ते पुढे केव्हां तरी सुखी होतील अशी कल्पना करावी तर त्याची खातरजमा कोणी केली आहे काय ? ह्मणजे न्यायी आणि दयाशील परमेश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीत इतका भेद कां हा प्रश्न शेवटी कायमच राहतो.

 हे सर्व ईश्वरनिर्मित आहे ' या कल्पनेने वरील अनेक प्रश्नांचा समाधानकारक निकाल लागण्याचे बाजूस राहून उलट सर्वांवर ताबा चालविणारा असा एक नवाच प्राणी ह्मणजे परमेश्वर आणखी निराळा कल्पावा लागतो. यावरून प्रत्येक प्राण्याला सुखांत अथवा दु:खांत जन्म येण्यास जन्मापूर्वीच कांहीं तरी कारणे घडली असली पाहिजेत हे उघड होते. आणि ही कारणे ह्मणजे त्याच प्राण्याची पूर्वजन्माची कर्मे होत.

 प्रत्येक प्राण्यास पूर्वसंस्कार आहेत हे कबूल केले ह्मणजे प्रत्येकाची निरनिराळी मन:प्रवृत्ति का, या प्रश्नाचा समाधानकारक उलगडा होतो. प्रत्येक प्राण्यांत आपणास दोन भिन्नधर्मी पदार्थाचे मिश्रण आढळून येते. या पदार्थांपैकी एक पदार्थ जडशरीर आणि दुसरा चैतन्यात्मक मन हा होय. आपणापुढे जी प्रश्नपरंपरा उभी राहते तिचा समाधानकारक निकाल जडपदार्थाच्या शास्त्रसिद्धांतांनी लागण्यासारखा असेल तर आत्म्याचे निराळे अस्तित्व मानण्याचे कारण उरत नाही. परंतु जड पदार्थात विचारशक्ति उत्पन्न करण्याचे सामर्थ्य आहे ही गोष्ट सिद्ध करता येत नाही.