पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

 काही वेळ जड आणि काही वेळ चैतन्यात्मक अशा द्विधा स्वरूपाचा ईश्वर आहे असें मानणे भाग पडते. याचा अर्थ जड आणि चैतन्ययुक्तं अशा भिन्न धर्माचे मिश्रण परमेश्वर आहे असा होतो. मिश्र पदार्थात कालेकरून फेरबदल होत होत त्याचे दृश्य स्वरूप नष्ट होते असा शास्त्रांचा सिद्धांत आहे. हाच नियम वरील प्रकारच्या परमेश्वरस्वरूपास लागू केला तर परमेश्वर मर्त्य आहे असा सिद्धांत निघतो आणि हे ह्मणणे तर धडधडीत खोटें आहे. याकरितां सृष्टीचा अमुक आरंभकाल आणि अमुक अंतकाल असें बोटाने दाखविणे शक्य नाही. ह्मणून सृष्टि ही अनाद्यनंत आहे हाच सिद्धांत निघतो. दोन वर्तुळे शेजारी शेजारी ठेविली तर त्यांच्या रेषांचा आदि अंत ठरविणे जसे अशक्य आहे, तसेंच परमेश्वर आणि सृष्टि यांचा आदिअंत ठरविणे अशक्य आहे. परमेश्वर सदोदित चैतन्ययुक्त असून त्याच्या शक्तीने अनंत सृष्टिमालिकांच्या घडामोडी विश्वांत नेहमी चालू आहेत. अव्यक्तांतून व्यक्तांत येऊन काही वेळ अस्तित्वांत राहून पुन्हां अव्यक्तांत लीन होणे हा सृष्टिव्यापार नेहमींचाच चालू आहे. त्यांत नवीन असें कांहींच उत्पन्न होत नाही. हीच गोष्ट

'ऋतं च सत्यं चाभीद्धात्तपसोऽध्यजायत ॥
ततोरात्र्यजायत ततः समुद्रो अर्णवः ॥
समुद्रादर्णवादधि संवत्सरो अजायत ॥
अहोरात्राणि विदधद्विश्वस्यमिपतोवशी ॥
सूर्याचंद्रमसौ धाता यथा पूर्वमकल्पयत् ॥
दिवं च पृथिवीं चांतरिक्षमथोस्वः ॥'

या श्रुतीने दर्शित केली आहे. प्रत्येक ब्राह्मणाचा मुलगा हे सूक्त रोज ह्मणत असतो.

 आपण असे समजू की, तुमच्यापुढे उभा असलेला जो 'मी ' त्याने स्वतः आपण कोण याच्या विचारास सुरवात केली. मी डोळे मिटून प्रथम इतर बाह्य जग विसरतों. नंतर विचारास सुरवात होते. 'मी' 'सी' 'मी' ह्मणजे कोण ? या प्रश्नाचे उत्तर ह्मणून प्रथम माझें शरीर माझ्या कल्पनाचहूंपुढे उभे राहते. तर मग 'मी' ह्मणजे केवळ जड वस्तूंचे मिश्रण आहे काय? यावर आमचे वेद उत्तर देतात, "बाबारे, तूं जड शरीर नव्हस. तूं या जड शरीरांत राहणारे चैतन्य आहेस." तर मग 'मी' ह्मणजे जड शरीर नव्हे. शरीर कालेकरून मृत होईल. 'मी' मात्र मरणार नाही. हे शरीर मृत्पिड झाले तरीहि 'मी' सदोदित जिवंत राहणारच.