पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

 वेद या शब्दाने एखाद्या विशिष्ट पुस्तकाचा उल्लेख केला जात नाही हे आपण ध्यानांत धरा. निरनिराळ्या महात्म्यांनी निरनिराळ्या वेळी जे विश्वव्यापी सिद्धांत शोधून काढिले, त्या सिद्धांतांच्या समुच्चयास वेद अशी संज्ञा आहे. न्यूटननें शोधून काढीपर्यंतहि गुरुत्वाकर्षणाचा नियम गतिनियमन करित होता आणि सर्व मानवजाति तो नियम विसरून गेली तरीहि तो आपले काम सोडणार नाही. जड जगाचे नियमन करणारे सिद्धांत जसे कालस्थलातीत आहेत, तसेच चैतन्ययुक्त विश्वाचे नियमन करणारे सिद्धांतहि कालस्थलातीत आहेत.

 निरनिराळ्या व्यक्तींचा परस्पर आत्मिक संबंध आणि सर्व व्यक्तींचा अथवा व्यष्टीचा समष्टीशी अथवा विश्वात्म्याशी संबंध ज्या सिद्धांतांनी नियत झाला आहे ते सिद्धांत त्रिकालाबाधित आहेत. या सिद्धांतांचा शोध लागण्यापूर्वीहि ते अस्तित्वात होतेच आणि उद्यां आपण ते सर्व विसरून गेलों तरीहि ते राहतीलच, यांत यत्किंचितहि संदेह नाही.

 हे सिद्धांत ज्यांनी शोधून काढिले त्यांस ऋषि असें ह्मणतात, आणि ते पूर्णरूप-परमेश्वरस्वरूप आहेत असे समजून आम्ही त्यांस मान देतो. यांत कित्येक स्त्रियाहि आहेत हे मी मोठ्या आनंदाने आपणांस सांगतो.

 हे सिद्धांत प्रत्यक्ष रूपानें अंतरहित असतील असें मानिले तरी ते तशा रूपाने अनादि नसावेत असे वाटते. एखादा समाज अस्तित्वात आला ह्मणजे त्याच्या नियमनाकरितां कांहीं कायदे तयार होतात. आणि समाज नष्ट झाला तर त्या कायद्यांचे अस्तित्वहि संपते. आतां त्या कायद्यांतील मूलतत्वे जरी सर्वकाल खरी ठरणारी असली तरी त्यांचे समाजाच्या अस्तित्वानंतरचे अस्तित्व केवळ भावरूप होते. त्या मूलतत्वांचे विधिरूप ह्मणजे कायदे यांचे अस्तित्व समाजाच्या अस्तित्वाबरोबरच संपते. तसेंच वरील सिद्धांतांचे विधिरूप प्रत्यक्ष दृग्गोचर झाले असा काल केव्हांतरी असला पाहिजे अशी कल्पना मनांत येते. ह्मणजे सृष्टि अंतरहित असली तरी अनादि नसावी अशी कल्पना मनांत येते. सृष्टि अनाद्यनंत आहे असें वेदांनी आम्हास सांगितले आहे. जडविश्वांत कितीहि फेरबदल झाले तरी विश्वाच्या चैतन्योत्पादक शक्तींत कमीअधिकपणा येत नाही, असा सिद्धांत भौतिक शास्त्रांनीहि ठरविल्याचे माझ्या ऐकिवांत आहे. तर मग या विश्वास ज्या वेळी सांप्रतचे मूर्तरूप नव्हते त्यावेळी आज दृग्गोचर होणारी ही चैतन्यशक्ति कोठे होती? ती अमूर्तरूपाने परमेश्वराच्या ठिकाणी लीन होती असे या प्रश्नाचे उत्तर कित्येक देतात. ही कल्पना खरी मानिली तर,