पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


आरंभिला आहे, त्याजबद्दल तुमचे किती आभार मानावे ! या तुमच्या उद्योगांत परमेश्वर खचित तुह्मांस साहाय्य करील.

६. हिंदुधर्माचे स्वरूप.

ता. १९ सप्टेंबर १८९३.

 

इतिहासकालाच्या पूर्वीपासून आजपर्यंत चालत आलेले असे तीन धर्मः आपणास सांप्रत उपलब्ध आहेत. हिंदुधर्म, जरदुष्ट्राचा धर्म आणि यहुदीधर्म. यहुदी धर्माची स्थिति पाहिली तर त्याच्याच पोटांतून निघालेल्या ख्रिस्तीधर्माने त्याची अगदी धुळधाण करून त्यास जन्मभूमीतूनसुद्धां हद्दपार केलें, जरदुष्ट्राच्या धर्माचीहि जवळजवळ तीच अवस्था आहे. पूर्वी जरदुष्ट्राचा धर्म होता इतके दर्शविण्यापुरती मूठभर पारशी लोकांची संख्या सध्या अवशिष्ट राहिली आहे. हिंदुधर्मावरहि अनेक हल्ले आजपर्यंत झाले. खुद्द त्याच धर्मात अनेक पोटपंथ उपस्थित होऊन काही वेळ त्यांचे एवढें प्रावल्य माजलें की वृद्ध वैदिकधर्म आतां नामशेष होतो की काय अशी भीति वाढू लागली. परंतु त्यावेळी दिसणारी पिछेहाट केवळ थोड्या वेळेपुरतीच होती. वैदिकधर्माचे आणि त्याच्यांच पोटांतून निघालेल्या या अनेक पंथांचे युद्ध संपून जरा स्थिरता आल्याबरोबर वैदिकधर्म जीवंत राहिला एवढेच नव्हे, तर पूर्वीपेक्षा दुप्पट जोराने फोफावू लागल्याचे नजरेस आलें. वैदिकधर्माने या सर्व पंथांतील आणि मतांतील तात्विक विचार खाऊन पचवून टाकिले.

 ज्यांचा केवळ लहानसा प्रतिध्वनि आधुनिक भौतिक शास्त्रे काढित आहेत अशा विश्वव्यापी वेदांततत्वांपासून तों पौराणिक कालच्या मूर्तिपूजेपर्यंत व बौद्धांचा शून्यवाद आणि जैनांचा निरीश्वरवाद यांतील सर्व तत्वविचार ज्यांत ग्रथित झाले आहेत असा सांप्रतचा हिंदुधर्म आहे. तर मग या अगदी परस्पर विरुद्ध दिसत असलेल्या तत्वांचे कोठे तरी केंद्रीकरण होणे शक्य आहे काय ? अगदी निरनिराळ्या दिसणाऱ्या या इमारतींचा एक सर्वसामान्य पाया असणे शक्य आहे काय ? इत्यादि प्रश्नांची परंपरा आपोआप उद्भवते. याच प्रश्नांची समर्पक उत्तरे देण्याचा आज मी यत्न करून पाहणार आहे.

 हिंदुधर्माची मूळ उत्पत्ति वेदांपासून झाली आहे. वेद अपौरुषेय आहेत व आदिअंतरहित आहेत असें हिंदूंचे मत आहे. एखाद्या पुस्तकाला आरंभ नाही व शेवटहि नाही ही गोष्ट तुह्मास खचित हास्यास्पद वाटेल; परंतु