पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.


 एका विहिरीत एक बेडूक राहत होता. तो बराच काळपर्यंत त्या विहिरीचा रहिवासी होता. त्याला डोळ्यांनी दिसत होते की नाही हे सांगण्यास आपले सध्याचे उत्क्रांतिवादी तेथे हजर नव्हते. परंतु त्या बेडकाला दृष्टि होती असें धरून चालण्यास नड नाही. विहिरीतील सर्व विषारी कीटक नाहीसे करून तिचे पाणी शुद्ध करण्याचा उद्योग तो वेडूक सदोदित करित असे. सध्याच्या जंतुशास्त्रज्ञांसहि हेवा वाटण्याइतके त्या वेडकाने विहिरीचे पाणी शुद्ध ठेविले होते. कालेकरून तो बेडूक चांगलाच पुष्ट दिसू लागला होता. असो. एके दिवशी कर्मवशात् समुद्रांतला एक बेडूक त्या विहिरीत आला. तेव्हां त्यांजमध्ये एक गमतीचा संवाद झाला.
 “ दादा, तूं कोठून आलास?"
 " मी समुद्रांतून आलो. "
 " तुझा तो समुद्र केवढासा आहे बरें ? माझ्या या विहिरीएवढा मोठा आहे काय ? " असें म्हणून विहिरीतल्या बेडकाने या कांठावरून त्या कांठावर उडी मारिली.
 “ वेड्या, तुझ्या या विहिरीची आणि माझ्या समुद्राची तुलना तरी होणे शक्य आहे काय?"
 आणखी एक उडी मारून विहिरीतला बेडूक म्हणाला, “खचित, तुझा समुद्र एवढा मोठा नसेल.” दुसरा उत्तर करितो, “ अहो अकलेचे खंदक, माझा समुद्र आणि तुमची विहिर यांच्या तुलनेचा नुसता विचारहि हास्यास्पद आहे, हे मी पूर्वी सांगितलें तें विसरलां वाटते ?”
 विहिरीतला वेडूक मोठ्याने ओरडून म्हणाला, “ जा, जा. माझ्या विहिरीपेक्षा मोठे असें कांही असणे शक्यच नाही. तूं अगदी खोटे बोलतोस. चल, येथून चालता हो."
 आपली मनुष्यांतली भांडणेहि बहुधा याच प्रकारची असतात. एक हिंदु आपल्या लहानशा खबदाडांत बसून सारे जग ह्मणजे तें खबदाड असें ह्मणतो. अशाच रीतीने ख्रिस्ती, मुसलमान वगैरे लोक आपआपल्या खबदाडांत सर्व विश्व सांठविले असल्याचे कंठरवाने सांगू लागतात.
 माझ्या अमेरिकन बंधूंनो, या सर्व निरनिराळ्या खबदाडांच्या भिंती जमीनदोस्त करून सर्वांस अफाट मैदानावर आणण्याचा जो स्तुत्य उद्योग तुह्मी