पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

2

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

ओटीत घेतले. पूर्वकाळी सुप्रसिद्ध असलेल्या जरदुष्ट्रनुयायांसही , आमच्याच देशांत आश्रय मिळाला. प्रिय बंधूंनो, माझ्या लहानपणापासून माझ्या नित्य पाठांत असलेले एक सूक्त मला आठवलें तें मी तुह्मांस ह्मणून दाखवितों. लक्षावधि हिंदुलोकांच्या नित्यपाठांत तें सूक्त आहे.

आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् ॥
सर्वदेवनमस्कारं केशवंप्रति गच्छति ॥

 'येऽप्यन्यदेवताभक्ता यजंते श्रद्धयान्विताः॥ तेऽपि मामेव कौंतेय यजंत्यविधिपूर्वकम् ॥' असें जें श्रीकृष्णांनी गीतेत म्हटले आहे त्याची सत्यता जगास पटविण्याकरितांच जणूं काय तुमची ही सर्वधर्मपरिषदेची कल्पना उदयास आली. परमतासहिष्णुता, बुद्धीचा आकुंचितपणा आणि त्यामुळे उद्भवणारे धर्मवेड यांचें पृथ्वीतलावर आज दीर्घ कालपर्यंत साम्राज्य सुरू आहे. या धर्मवेडामुळे किती भयंकर जुलूम झाले, केवढाले रक्तपात झाले, संस्कृतीस कैक जबर धक्के बसले आणि कैक मोठमोठी राष्ट्र निराशापंकांत रुतून गेली. जर धर्मवेड पृथ्वीवर जन्मास आले नसते तर मानवजातीची आजला जी स्थिति आपण अनुभवित आहों तीहून खास अधिक चांगली प्रगति आपणांस पाहावयास सांपडली असती; परंतु आतां या धर्मवेडाचे आयुष्य भरत आल्याची शुभचिन्हें दृग्गोचर होऊ लागली आहेत. आपल्या आजच्या सभेचे काम सुरू झाल्याचा सूचक ह्मणून जो मोठा घंटानाद झाला, त्याने जणूं काय ह्या धर्मवेडाचा मृत्यु झाल्याचेच जगास जाहीर केले. सर्व जग निरनिराळ्या मार्गानी परंतु एकाच केंद्राकडे धांव घेत आहे; त्याजमधील द्वेषबुद्धि लयास गेली आहे व आतां तरवारीच्या धारेनें अथवा इतर कोणत्याहि मार्गाने परस्परांचा छळ करण्याचे दिवस उरले नाहीत, असेंच त्या घंटानादाने जगास सूचित केले आहे.

२. मतभेद कां होतो?

ता. १५ सप्टेंबर १८९३.

 माझ्या पूर्वीच्या एका वक्त्याने जगांत सर्वत्र मतभेद दिसतो याबद्दल दुःख प्रदर्शित करून 'आपण ही भांडणे बंद करूं या ' अशी विनंति केली. माझ्या लहानपणी ऐकिलेली एक गोष्ट मी तुम्हांस सांगणार आहे. जगांत सर्वत्र मतभेद कां दिसतो याचे विवेचन या लहानशा गोष्टीवरून बरेंच होण्याजोगे आहे.