पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.
प्रथम खंड.
सर्व धर्मांच्या परिषदेपुढे दिलेली व्याख्याने.
१. अमेरिकेतील स्वागतास उत्तर.

ता. ११ सप्टेंबर १८९३.


माझ्या अमेरिकन भगिनिबंधूंनो,

 आह्मां सर्व धर्माच्या प्रतिनिधींचें जें तुह्मीं अंतःकरणपूर्वक स्वागत केले त्याजबद्दल तुह्मां सर्वांचे आभार मानण्यास मला अत्यानंद होत आहे. खरी संन्यस्तवृत्ति ह्मणजे काय हे आपल्या उदाहरणाने ज्यांनी जगाच्या प्रथम निदर्शनास आणिलें त्यांच्या वतीने, तसेंच जगांतील सर्व धर्माची जननी असा जो हिंदुधर्म, त्या धर्माच्या वतीने आणि निरनिराळ्या वर्णाच्या व धर्ममार्गाच्या कोट्यवधि हिंदूलोकांच्या वतीने मी सर्वांचे आभार मानितों.

 तसेंच जगाच्या लांबलांबच्या भागांतून येथे आलेल्या प्रतिनिधींपैकी ज्यांनी आह्मां पौर्वात्यांच्या परमतसहिष्णुतेचा प्रसार, आपापल्या देशांत करण्याचे वचन दिले, त्या सर्व प्रतिनिधींचेहि मी आभार मानितो. परधर्मसहिष्णुता आणि विश्वबंधुत्व यांची ओळख साऱ्या जगास ज्या धर्माने प्रथम करून दिली त्या धर्मात माझा जन्म झाला याचा मला मोठा अभिमान वाटतो. सर्व धर्माबद्दल सहिष्णुता बाळगावी इतकेच नव्हे तर सर्व धर्म सत्य आहेत, असा आमचा समज आहे. स्वतःच्या राष्ट्रांत मतभेदामुळे ज्यांचा छळ झाला व वित्त आणि जीवित यांसहि सुरक्षितपणा राहिला नाही, अशा सर्व धर्माच्या व सर्व जातींच्या लोकांस ज्या भूमीने आपल्या पोटांत घेतले, तीच माझी जन्मभूमी आहे, याचा मला अभिमान वाटतो. रोमनराष्ट्राच्या जुलमाने ज्यांचा धर्म नामशेष होण्याच्या मार्गास लागला त्या यहुदी लोकांस माझ्या जन्मभूमीने आपल्या