पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/308

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२८३

विशिष्ट देशानें मजवर काय ह्मणून हक्क सांगावा ? हिंदुस्थानाला मदत करायची ह्मणजे तुझा लोकांची गुलामगिरी मी पत्करिली आहे काय ? अरे चार्वाकाच्या शिष्यांनो, आतां यापुढे तुमची बडबड बंद करा.

 मला मिळाला तितका सारा पैसा मी कलकत्त्यास आणि मद्रासेस पाठवून दिला. तुमच्यासाठी एवढी खटपट केली. आतां तुमची वायफळ बडबड मी कां ऐकून घेऊ ? माझ्या वर्तणुकीवर मूर्खपणाची टीका करतांना तुह्मांला काही लाज वाटत नाही काय ? तुमचे मी काय लागतों ? तुमच्या स्तुतीची जर कवडीभर किंमत मला वाटत नाही, तर तुमच्या निंदेला तरी मी काय भीक घालणार आहे ! गड्या, मी एक अगदी दुनियेवेगळा विक्षिप्त मनुष्य आहे. मी कोण आहे आणि कसा आहे याची तुलासुद्धां अद्यापि पुरती पारख झाली नाहीं ! तुमच्याने कांही उद्योग झाला तर करा. पण आपले मूर्खत्व माझ्यावर लादण्याचा उद्योग मात्र करूं नका. माझ्या पाठीमागे मानवीसामर्थ्याहून आणि परमेश्वरी सामर्थ्याहूनहि महत्तर अशी ज्योति उभी आहे. मला कोणाच्याहि मदतीची अपेक्षा नाही. लोकांना मदत करण्याचाच उद्योग मी माझ्या साऱ्या आयुष्यभर केला.
 भगवान रामकृष्ण परमहंसांसारख्या अद्वितीय मनुष्याच्या कार्याची पूर्ति करण्यासाठी थोडेसें द्रव्यहि तुमच्याने जमवलें नाही ; आणि अशा लोकांनींदुसऱ्यास शहाणपण शिकविण्यास तोंडे उघडावी ! आपल्या हातून ज्याने तुह्मांस शक्य ती मदत केली त्याचे उपकार असे फेडतां काय ? असो. जगाची ही रीतच आहे.

 जातिभेदाने तुमचा समाज चाळणीसारखा करून टाकला आहे ! तुमचा धर्म ह्मणजे भोळसरपणा ! निर्दयता, दांभिकपणा आणि भेकडपणा यांच्याशी तुमचे कायमचे सख्य ! ईश्वरावर तर तुमचा काडीइतकाहि विश्वास नाही. तुमच्याच सारखा होऊन मी राहावे आणि एक दिवस मरून जावें अशी तुमची इच्छा आहे काय ? तुह्मां सुशिक्षित हिंदु लोकांत वरील गुणांचा मात्र सध्या सुकाळ झाला आहे. भेकडपणाचा मला पक्का तिटकारा आहे. तसेंच राजकीय बाबतीचाहि मला मनापासून कंटाळा वाटतो. परमेश्वर आणि सत्य हीच माझी राजनीति. याखेरीज में कांही उरले, त्याची किंमत धुळीइतकीसुद्धा मी समजत नाही. उदईक मी लंडनास जाईन.

आपला,

विवेकानंद.