पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/307

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२८२

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

हांड्याभांड्यांचा आवाज हाच तुमचा वेदघोष. असो. पण तुझ्यासारखे कांहीं थोडे मर्दहि मधून मधून आढळत नाहीत असे नाही. माझ्या शूर मुलांनो, आतां आपआपल्या कामास असेंच चिकटून रहा. माझ्या मुलांत भेकड कोणीहि निपजूं नये अशी माझी इच्छा आहे. मोठी कामें अडथळ्यावांचून कधी तरी पार पडली आहेत काय ? धीर, चिकाटी आणि अनिवार्य इच्छाशक्ति ही एकवटून चालली झणजे या त्रयीचा परिणाम केव्हां तरी होणारच. दुसऱ्या कित्येक गोष्टी तुला सांगितल्या तर तुला आनंदाच्या अगदी उकळ्याच फुटतील; पण जाऊंद्या. सारे आजच नको. 'वज्रादपि कठोराणि' अशा हृदयांची माणसे मला हवींत. आकाश फाटले तरी त्याची यत्किंचितहि क्षिती ज्यांना वाटणार नाही, अशी मनुष्ये मला हवी आहेत. परमेश्वर तुह्मांवर कृपा करो इतकीच इच्छा बाळगणारा

तुह्मा सर्वांचा,

विवेकानंद.

पत्र २१वे.

पॅरिस, ता. ९ सप्टेंबर १८९५.

प्रिय- -
 तुझें पत्र पाहून मला खरोखर नवल वाटले. कोणाच्याहि टीकेनें तुह्मीं इतके घाबरून कां जातां? मी माझें खाणे अगदी हिंदुपद्धतीचे ठेवावें असें तुह्मां लोकांस वाटत असेल तर इकडे एक आचारी व पुरेसा पैसा, एवढे पाठवा पाहूं. तुमच्याकडून एका फुटक्या कवडीचीहि मदत कोणाला होणार नाही. मग तुमच्या सव्वाहात बाता ऐकून मला हसू आले तर नवल काय? संन्यासाश्रमाच्या मुख्य अटी दोन. अकिंचनता आणि पवित्र वर्तन. यांपैकी एखादी अट मी मोडली असें कोणी तुह्मांस सांगितले तर ते नि:संशय खोटे बोलत आहेत असें तुह्मीं समजा. माझ्या वर्तनाबद्दल तुला....... सांगितले त्यावर तूं विश्वास ठेवू नको. त्याला माहिती कोठून मिळाली आणि माझें वर्तन कोणकोणत्या प्रसंगी अनुचित होते, याची लेखी यादी त्याजपाशी माग. ह्मणजे त्याच्या तोंडास आपोआप कुलुप बसेल.

 आतां माझ्याविषयीं ह्मणशील तर कोणाच्याहि सांगण्याने बांधला जाणारा मी नव्हें. माझा जन्म कोणत्या कार्यासाठी झाला आहे ते मला ठाऊक आहे. माझें कार्य जितकें हिंदुस्थानाकरितां तितकेंच इतर जगाकरितांहि आहे. याबद्दल वितंडवाद करण्यांत फायदा नाही. तुमच्यासाठी माझ्याने काही झाले तें मी करून चुकलो आहे. आतां यापुढे तुमची तुह्मींच कंबर बांधली पाहिजे. एखाद्या