पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/306

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२८१

 हिंदुस्थानापेक्षां पाश्चात्य देशांतच माझ्या कल्पना अधिक चांगला जीव धरतील असें तूं ह्मटलेंस तें अक्षरशः खरे आहे. खरोखर पाहिले तर ज्या हिंदुस्थानासाठी मी इतका उद्योग केला, त्या हिंदुस्थानाने मात्र मला योग्य मदत केली नाही. आपला मार्ग खरा असला ह्मणजे आपणांस वाटतील तितकी कार्यकारी माणसे मिळतात अशी माझी खात्री आहे, आणि मला अनुभवहि अगदी तसाच येत आहे. येथे मला कित्येक शिष्य रोज येऊन मिळत आहेत. आणि ते चेले ह्मणजे असेतसे नसून प्रसंगी आपल्या गुरूसाठी प्राणहि देण्यास तयार असे आहेत. सत्य हाच माझा परमेश्वर आणि विश्व हाच माझा देश. 'कर्तव्य' ह्मणून तुझी काय ह्मणतां तें मी ओळखीत नाही. मला 'कर्तव्य' ह्मणून भेडसावू पहातां काय ? कर्तव्याचें जूं संसाऱ्यांनी वाटेल तर वहावें. 'अहं निर्विकल्पी निराकाररूपी । विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेद्रियाणाम् । न चासंगतं नैव मुक्तिर्न मे यः । चिदानंदरूपः शिवोहं शिवोहम् ।' असें ह्मणणाऱ्या संन्याशाला आतां 'कर्तव्य' असें काय उरलें आहे ? 'कर्तव्य' हा संसारी मुलांलेकरांचा बागुलबोवा आहे. 'मरण माझें मरोनि गेले' असा अनुभव आल्यामुळे मी सर्व बंधनांतून आतां मुक्त झालो आहे. आतां देह राहिला काय आणि गेला काय, मला त्याचा विधिनिषेध नाही.

 आतापर्यंत तूं मला अगदी बिनमोल मदत केली आहेस. ईश्वर तुला त्याबद्दल बक्षिस देईल. हिंदुस्थानाने अथवा अमेरिकेने माझा गौरव करावा आणि मजवर स्तुतीचा वर्षाव करावा अशी इच्छा मला कधीच झाली नाही. स्तुतीची किंमत पाण्यावरील बुडबुड्याहून अधिक नाही, अशी माझी खात्री असतां ती मिळविण्याची इच्छा मला होईल कशी? सत्यमार्ग लोकांस दाखवावा इतकेंच माझें काम. मी माझ्या परमेश्वराचें लेकरूं. त्याची आज्ञा प्रमाण मानून कार्य करावे इतकेंच मला समजतें. ज्या माझ्या भगवंताने मला सत्यमार्ग दाखविला, तोच मला अनुयायीहि मिळवून देईल. ते अनुयायी कसे ? तर मानवीवृक्षाचा मोहोर. अरे हिंदूंनो! परमेश्वर आपला कार्यभाग पाश्चात्य देशांत कसा पार पाडतो याचा तुह्मांस लवकरच अनुभव येईल. तुह्मी हिंदुलोक ह्मणजे पूर्वकालच्या यहुद्यांसारखे आहांत. खरोखर, तुह्मीं गवताच्या गंजीवरील कुत्र्यासारखे आहां. तुमजवळ आहे तें तुह्मी स्वतःहि खाणार नाही दुसऱ्याला देणारहि नाही. अरे, तुह्मी कसले धार्मिक ? तुह्मांस खरोखर कांहीं धर्मच नाही. तुह्मांला दोन वेळ चमचमीत भोजन मिळाले की देव पावलासे वाटतें ! स्वयंपाकघर हेच तुमचें देवघर.