पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/305

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२८०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

सर्व हिंवाळा निघून जाईल असे वाटते. परमेश्वराची कृपा असेल, तर एवढ्या अवधींत येथे बरेच लोक मिळून माझ्या पाठीमागें माझें कार्य सतत चालू राहील असे मला वाटते. कोणतेंहि महत्कार्य ह्मटले की त्याला अडथळे हे यावयाचेच. लोक प्रथम चेष्टा करतात; नंतर अडथळ्यांस सुरवात होते; पण या दोन दिव्यांतून ते कार्य उत्तम रीतीने पार पडलें ह्मणजे त्याच कायांच्या पूर्तीसाठी लोक आपण होऊन मदतीस पुढे येतात. चालू परिस्थितीच्या पलीकडे ज्याची नजर पोहोचली आहे, अशा मनुष्याबद्दल सामान्य लोकांत प्रथम गैरसमज झाला तर त्यांत नवल नाही. यासाठी अडथळे आणि लोकांकडून होणारा छळ ही आनंदाने सहन केली पाहिजेत. लोकांनी माझा कितीहि छळ केला तरी माझें अंतःकरण धुतलेल्या तांदुळासारखें असेल आणि परमात्मपदी माझा दृढ भरंवसा असेल तर कालेंकरून सर्व विघ्ने विलय पावतील, यांत मला तिळमात्र शंका वाटत नाही.

आपला,

विवेकानंद.

पत्र २० वे.

ऑगस्ट १८९५.

प्रिय--

 माझं हे पत्र तुला पोहोंचेल त्या सुमारास मी पारीस शहरी असेन. या साली बराच कार्यभाग झाला आहे, व पुढील सालींहि बरेंच कार्य करण्याची मला उमेद आहे. मिशनऱ्यांबद्दल अधिक विचार करीत बसण्यांत तात्पर्य नाही. त्यांच्या पोटांत कळ येते, यांत काय नवल आहे ? त्यांचे अस्तित्वच जर संपुष्टांत येऊ लागले तर त्यांनी माझ्याविरुद्ध ओरड करावी हे रास्तच आहे. त्यांना इकडून मिळणाऱ्या रकमेत यंदां बराच खाडा पडला आहे, आणि हा खाडा अधिक रुंदावत जाण्याची चिन्हें दिसू लागली आहेत. पण असे असले तरी मिशनरी संस्था बंद पडाव्या अशी माझी इच्छा नाही. त्यांनाहि यश यावे हीच माझी इच्छा आहे. आपला सर्व भार परमेश्वर आणि सद्गुरु यांच्या चरणी अर्पण करून खुशाल असावे. त्यांच्या चरणी आपली श्रद्धा दृढ आहे तोपर्यंत आपणांस चेंहि भय बाळगण्याचे कारण नाही. पण यांपैकी कोणत्याहि एकावरील श्रद्धा ढळली तर मात्र आपले हाल कुत्रा खाणार नाही .