पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/304

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२७९

शंका असते. मी स्वतःस आतां माझ्या भगवंताच्या स्वाधीन केले आहे. जोंपर्यंत मी पवित्र आहे आणि जोपर्यंत मी त्याचा हुकूम बजावीत आहे, तोपर्यंत कोणी कितीहि खटपट केली तरी माझ्या डोक्याचा एक केंसहि त्याच्यानें वांकडा करवणार नाही. 'लोक मदत करीत नाहीत' ही तुमची नेहमीचीच रड आहे. पण लोकांकरितां तुह्मीं तरी काय केले आहे, याचा काही विचार करा. खरोखर लोकांकरितां असा एखादा उद्योग तुह्मीं आरंभिला तर लोकहि तुह्मांस खचित मदत करतील. जन्म आणि मृत्यु हे एकेकदांच येतात. त्यांच्या अवधींत काही तरी कार्य करून न दाखविलें तर'अजागलस्तनस्येव तस्य जन्म निरर्थकम्' असें ह्मणून घ्यावे लागते. माझ्या शिष्यांत असा कोणी निपजूं नये अशी माझी इच्छा आहे.

तुह्मां सर्वांवर सदैव प्रेम करणारा,

विवेकानंद.

पत्र १९ वे.
( खेत्रीच्या महाराजांस लिहिलेले.)

ता० ९ जुलै १८९५.

 मी हिंदुस्थानांत लवकर यावे अशी माझ्या मित्रमंडळीची इच्छा असल्याचे समजले. कोणतेंहि काम अर्धवट ठेवण्याची मला संवय नाही. एखाद्या कामांत मी पडलों तर तें शेवटास जाईपर्यंत स्वस्थ बसावयाचेंच नाही, असा माझा स्वभाव आहे, हे महाराजांस ठाऊकच आहे. मी येथें जें बीजारोपण केलें आहे, तें आतांच जमिनींतून वर येऊ लागले आहे व त्याचा लवकरच चांगला वृक्ष होईल अशी मला उमेद आहे. सध्या मला बरेच अनुयायी मिळाले आहेत, पण आणखी बरेच संन्याशी येथे होईपर्यंत मला तिकडे येतां येत नाही. येथून मी निघून गेलों तरी माझें कार्य माझ्या मागे सतत चालू राहण्याची व्यवस्था मला केली पाहिजे. ख्रिस्ती धर्मोपदेशकांकडून बराच अडथळा होत आहे; पण यामुळे येथील माझ्या आगमनाची खूण माझ्या मागेंहि राहील असें करण्याची माझी इच्छा बळावली आहे.

 मी अद्यापि लंडनास गेलो नाही; पण मला तेथें कित्येक मित्र अगोदरच मिळाले आहेत. येत्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस लंडनला जाण्याचा माझा बेत आहे. लंडन आणि न्यूयॉर्क यांच्या दरम्यान फेऱ्या करण्यांत बहुतकरून