पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/303

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

हिंदुस्थानांत आलों, तरी माझें येथील कार्य चालविण्यास व शिवाय मला हिंदुस्थानांतहि मदत करण्यास योग्य असे गृहस्थ येथे मिळतील. यासाठी, माझ्याबद्दल यत्किचिहि काळजी करण्याचें तुह्मांस कारण नाही. मिशनरी लोक हिंदुधर्माविरुद्ध भाषणे करतात, हे पाहून आपलीच मनगटें चावण्यापलीकडे तुह्मीं काय केले आहे ? हिंदुधर्माचें पायाशुद्ध ज्ञान लोकांस तुह्मीं कां देऊं नये ? तसें करण्यास तुमची तोंडे कोणी बांधली आहेत काय? माझ्यासारखा एकटा संन्यासी किती गोष्टी करूं शकेल? तुह्मी निव्वळ लांकडाचे ठोकळे आहांत ! तुह्मांकडे पाहून मला खरोखर हंसू येते. तुमच्यासारख्या वृद्ध मुलांस मी मदत तरी कशाची करूं ?

 तुह्मा सजीव पुतळ्यांस मारून झोडपून खऱ्या मनुष्याच्या स्थितीस आणण्याचे अवघड कामहि मलाच करावे लागणार, हे मी जाणून आहे. खरें ह्मणशील तर हिंदुस्थान देश सध्या लांकडी पुतळ्यांनी भरला आहे. यासाठी आपलें डोके फिरविण्यांत अर्थ नाही. तेथे येऊन कांहीं कार्य करावयाचें म्हटले, तर त्याची जुळवाजुळव येथे केली पाहिजे. पैशासंबंधी वगैरे सर्व मदत मला येथूनच मिळविली पाहिजे. अशा मदतीची खात्री झाल्याशिवाय तेथे येऊन नि:सत्व माणसांच्या हाती पडल्यासारखें मात्र होईल. आतां स्वतःस अधिक त्रास करून न घेतां तुझ्याने जे थोडेबहुत कार्य होईल तेंच कर. येथून तेथपर्यंत सर्व कामें शेवटी माझ्या एकट्याच्या गळ्यांत पडणार हे मला ठाऊकच आहे ! कांहीं हरकत नाही. माझा पाठीराखा सदोदित जवळ उभा असतां मला भय कसले आणि काळजी तरी कसली? कोणत्याहि गोष्टींत तुह्मांस स्वतःचे संरक्षण करतां येतें, एवढे जरी तुह्मीं मला दाखविले, तरी मला फार समाधान होईल. आपले बुद्धिसामर्थ्य तुह्मी प्रत्यक्ष कृतींत अल्प प्रमाणावर जरी प्रकट केले तरी मला त्याचे फार कौतुक वाटेल. माझ्यासंबंधी कोणीहि कांहीं बरें वाईट बोलला तर ते मला कळवून उगीच त्रास देऊ नको. जगांतल्या प्रत्येक मूर्खाच्या न्यायासनासमोर आपली योग्यता सिद्ध करण्याची माझी इच्छा नाही. प्रचंड उद्यमशीलतेनें, मोठ्या धैर्याने आणि अखंड चिकाटीनेच मोठाली कार्ये पार पडतात, हे अद्यापि न समजण्यासारखें तुझें वय आहे काय ?

 कोणतीहि गोष्ट पार पाडण्यास अंगांत धमक असावी लागते. दुबळ्याच्या हातून या जगांत एखादें लहानसें कार्यहि पार पडावयाचे नाही. मग मोठ्या कार्याबद्दल तर बोलावयासच नको. तुह्मी तोंडाने 'अरे परमेश्वरा' असें ह्मणतां, पण त्याचवेळी परमेश्वर खरोखर अस्तित्वांत तरी आहे की नाही, याची तुह्मांस