पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/302

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२७७

संरक्षण करणे अवश्य नाही काय ? त्याची मुळे जोमदार होऊन गुरेढोरें व सोसाट्याचे वारे यांजपासून स्वतःचे संरक्षण करतां येण्याइतका तो मोठा होईपर्यंत माळ्याची नजर त्याजवर असली पाहिजे.

 कोणतेंहि कार्य घाईने बिघडते. 'सहसा विदधीत न क्रियाम् । अविवेकः परमापदांपदम् ॥' हे कविवचन नित्य लक्ष्यांत बाळगून सदैव कार्यमग्न हो. परमेश्वर माझा मार्गदर्शक असतां काय होईल आणि कसे होईल याची काळजी का करूं ? सर्व नीट होणारच यांत संशय नाही.

तुमची सदैव प्रेमवृद्धि इच्छिणारा,

विवेकानंद.

पत्र १८ वे .

ता. १ जुलै १८९५.

प्रिय___

 पुन्हां एकवार मी तुला सांगून ठेवतों की, या जगांत आपल्या संरक्षणासाठी आपणच कंबर बांधली पाहिजे. तुह्मी असें लहान मुलांसारखें कां करतां? तुमच्या धर्मावर कोणी हल्ला केला, तर त्याचे संरक्षण तुह्मींच केले पाहिजे. माझ्याबद्दल काळजी करण्याचे तुह्मांला कारण नाही. मला येथे शत्रूपेक्षां मित्रच अधिक आहेत. खरें ह्मणशील तर या देशांत खरे ख्रिस्ती असे सुमारे तृतियांश लोक आहेत. त्यांतून मिशनऱ्यांबद्दल प्रेम असलेले असे लोक सुशिक्षितांत तर फारच थोडे आहेत. उलट मिशनरी लोकांनी एखाद्याची निंदा केली तर तेवढ्यामुळेच त्या गोष्टीचे कौतुक करणारे असे लोक येथे पुष्कळ आहेत. मिशनरी लोकांचें वजन येथे ( अमेरिकेंत ) दिवसेंदिवस कमीच होऊ लागले आहे. ते हिंदुधर्माविरुद्ध बोलतात याचें तुला इतकें वाईट वाटत असेल तर त्यांना जबाब देण्याइतकें सामर्थ्य तुला नाही काय? कोणी रागें भरल्याबरोबर लहान मूल जसें आईकडे रडत जाते, तसेंच तूंहि करावेंस, हे मला योग्य दिसत नाही. इतकी बालबुद्धि असणे हा काही खरोखर सद्गुण नाही.

 येथे मला बरेच अनुयायी मिळाले आहेत. आतां याच अनुयायांची सुसंबद्ध रचना करण्याच्या विचारांत मी आहे. एकवेळ अशी रचना झाली ह्मणजे माझ्या पाठीमागेहि माझें कार्य येथे सुरळीत चालेल. इतकी व्यवस्था पक्की झाल्यावर मी