पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/301

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२७६

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.
पत्र १६ वें.

न्यूयॉर्क, ता. १४ मे ९५.

प्रिय_
 न्यूयॉर्क येथे आपल्या कार्याचा पाया आतां बहुतेक मजबूत होत आला असून माझ्या पाठीमागें तें चालू ठेवण्यासारखे अनुयायीहि मला बरेच मिळाले आहेत. सध्या येथील वर्तमानपत्रांत येणारे लेख वाचून तुह्मांस माझ्या येथील कार्याच्या स्थितीची खरी कल्पना होणार नाही. मी येथून निघून गेल्यानंतर माझें कार्य सतत चालू राहील अशी व्यवस्था मला करावयाची आहे आणि परमेश्वर कृपा करील तर हे लवकरच घडून येईल, असा भरंवसा मला वाटू लागला आहे. अशा कार्यासाठी खऱ्या मर्दीची जरूर असते. साऱ्या जगांतला पैसा एका ठिकाणी केला तरी शूर माणसांच्या अभावी असली कार्ये कुजत पडतात.

 माझ्याबद्दल निरर्थक काळजी करीत बसू नका. मी अयोग्य वेळी येथून बाहेर गेलो तर इतके दिवसांचे माझे श्रम पाण्यांत जातील. असे होऊ देतां उपयोगी नाही.

 माझी नाचक्की करण्याकरितां भल्याबुऱ्या वाटेल त्या उपायांची योजना करणारे येथे जरी बरेच लोक आहेत, तरी उलटपक्षी माझ्या जिवास जीव देणारेहि अनेक मित्र मला मिळाले आहेत.

 अत्यंत पवित्रता, अत्यंत स्थैर्य आणि अत्यंत सहनशीलता हीच यशाची मुख्य साधने आहेत.

आपला,

विवेकानंद.

पत्र १७ वें.

न्यूयॉर्क, ता० २२ जून १८९५.

प्रिय--

 मी हिंदुस्थानांत कधीच परत येणार नाही असा तुमचा समज झालेला दिसतो. परंतु तो समज खरा नाही. तिकडे लवकरच परत येऊन माझ्या जन्मभूमीची सेवा करण्याची माझी इच्छा आहे. कोणत्याहि कार्यात अपयश घेऊन मागे फिरणे मला पसंत नाही. येथें जें वृक्षारोपण मी केले आहे, त्याला नुकतीच कोठे पालवी फुटूं लागली आहे. अशा वेळी गुरांढोरांच्या तोंडांपासून त्याचे