पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/300

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२७५

आहे. दांभिकपणाने स्वतःचा बडेजाव जर मला वाढवावयाचा असता तर येथे एखादी मोठी धर्मसंस्था अथवा पंथ काढणे मला फारसे अवघड गेले नसतें. हाय ! हाय ! कनक आणि कांता यांचे साम्राज्य अमेरिकेसारखं दुसऱ्या कोठेहि नसेल. धर्मोपदेशकांचा वर्ग पाहिला तर 'कवडी कवडीमाया जोडी, रुपिया लाख करोड' हेच त्याचे पालुपद. व्यावहारिक लोकांना धनतृष्णा तर अत्यंत आहेच पण कामिनीच्या हव्यासाचीहि त्यांत आणखी भर पडली आहे. इंद्रियजन्य सुखावर लाथ मारून केवळ परमेश्वराचे अव्यभिचारी भक्त मला अशा लोतून निर्माण करावयाचे आहेत. हीच माझी येथील कामगिरी आहे. हे कार्य अगदी हळू हळू सिद्ध होणार हे उघडच आहे. तुह्मी आपल्या हिंदुस्थानांतील कामगिरीस सुरुवात करा.

 आपण जें वर्तमानपत्र काढणार आहों, त्यांत आपल्या कार्याशी संलग्न नसलेले असे कोणतेहि विषय येऊ न देण्याविषयी तुह्मीं पूर्ण खबरदारी घेतली पाहिजे. यासाठी आपल्या कार्याचे भव्य स्वरूप आणि मोठा दर्जा यांचा कधीहि विसर पडूं देऊं नको. कसलेले आणि ओजस्वी अशाच लेखकांचा संग्रह तुह्मीं केला पाहिजे. तसेंच अहंकार पूर्णपणे विसरून अत्यंत सावधगिरीने पण निश्चयाने एक एक पाऊल तुह्मीं पुढे टाकीत राहिले पाहिजे. भीति आणि अश्रद्धा यांस आपल्या हृदयांतून प्रथम हद्दपार करा. आपण मोठाले कार्यभाग खचित उठविणार आहो. लोकांचे पुढारी होण्याची इच्छा बाळगू नका. त्यामुळे मी मोठा आणि इतर माझे अनुयायी असला दुष्ट अहंकार हृदयांत शिरतो. आपण सर्वांचे सेवक-सर्वांचे पट्टेवाले-आहों अशीच आपली भावना सदोदित राहिली पाहिजे. सर्वांनी माझें ऐकिले पाहिजे असा दुरभिमान झाला ह्मणजे त्यामुळे परोत्कर्षासहिष्णुतादि अनेक विकार आपल्या हृदयांत माहेरघर करतात आणि त्यामुळे शेवटी सर्व कार्याचा नाश होतो.

 तुह्मीं कार्याचा आरंभ चांगला केला आहे. आतां चिकाटीने एक एक पाऊल तुह्मीं पढें टाकले पाहिजे. आपणास कोणाशीहि शत्रुत्व करावयाचे नसून सर्वत्र मित्रभाव वृद्धिंगत करावयाचा आहे. आपण पुढारी ह्मणून कार्यास आरंभ केला तर एखादें कुत्रेसुद्धा आपल्या मदतीस येणार नाही. यासाठी आपलें कार्य यशस्वी व्हावे असे वाटत असेल तर अहंकार सोडला पाहिजे.

आपला,

विवेकानंद.