पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/299

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२७४

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

शक्ति आणि कोदंड मोडण्यासारखे सामर्थ्यवान् भुजदंड दिले आहेत. मग मी दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा कां करूं ? माझे सर्व बेत मी एकटाच स्वतःच्या सामर्थ्यावर पार पाडीन.

 वेदांतमतापर्यंत हिंदुतत्वज्ञानाच्या एकंदर तीन पायऱ्या आहेत. त्या तीन पायऱ्या ह्मणजे द्वैत, विशिष्टाद्वैत आणि अद्वैत ह्या होत. एकामागून एक असा यांचा क्रम आहे. मनुष्याच्या धार्मिक जीवनाचा आरंभ द्वैतांत आणि पर्यवसान अद्वैतांत होते. द्वैतास आरंभ करून आपल्या शक्तीप्रमाणे एक एक पायरी चढतां चढतां तो शेवटी पूर्ण अद्वैती बनतो. धर्माचें हेंच तात्विक स्वरूप आहे. हीच तत्वे निरनिराळ्या चालीरीतींत प्रत्यक्ष गोचर होऊं लागून सांप्रतचा हिंदुधर्म बनला आहे. मानवी धर्मबुद्धीचा प्रथम द्वैतांत उदय होतो. द्रुतमार्गाचे जे स्वरूप युरोपखंडांत व्यक्त झाले, त्यास ख्रिस्ती धर्म अशी संज्ञा प्राप्त झाली. पौर्वात्य देशांत प्रकटलेलें स्वरूप मुसलमानी धर्म या नावाने ओळखले जाते. अद्वैतांतील शुद्ध योगमार्गाचे स्वरूप ह्मणजे बौद्ध धर्म होय. निवळ धर्म या शब्दाचा अर्थ मी 'वेदांत' असा करतो. भोवतालची परिस्थिति आणि गरजा यांच्या संगाने तो निरनिराळ्या स्वरूपाने प्रगट झाला इतकेंच. शाक्त, शैव इत्यादि निरनिराळे पंथवालेहि वेदांतांतील तत्वांचाच आपल्या मताला व आचाराला आधार घेतात.

 तुह्मी जें मासिक पुस्तक सुरू करणार आहां, त्यांत याच धोरणाने एकसारखे लेखामागें लेख तुह्मांस लिहिले पाहिजेत. धर्मतत्वांच्या या तीन निरनिराळ्या पायऱ्या असून त्यांत सर्वत्र एकवाक्यता आहे, ही गोष्ट प्रमुखपणे तुह्मीं लोकाच्या नजरेस आणिली पाहिजे. निरनिराळ्या मतवाल्यांच्या आचारांवर टीका करण्याचे आपले काम नाही. तत्वज्ञानाचे पूर्ण विवरण करून ते लोकांच्या मनांत ठसेल असे करणे हे आपले काम आहे. हे तत्वज्ञान प्रत्यक्ष व्यवहारांत कसे -आचरावें, हे ज्याचे त्याने आपआपल्या परिस्थितीप्रमाणे ठरवावें. वर दाखविलेल्या रूपरेखेस अनुसरून मला एक ग्रंथ लिहावयाचा होता, व याचसाठी तिन्ही प्रमुख आचार्यांची भाष्ये मी मागविली होती. सध्या मला फक्त रामानुजाचायांचे भाष्य मिळाले आहे. मी काही मोठा पट्टीचा लेखक नाही हे तुह्मांस ठाऊकच आहे. असो.

 दारोदार भीक मागत फिरणे माझ्या स्वभावाला आवडत नाही. काही काम नसले तर मी घरी स्वस्थ बसून राहतो. कांहीं काम आपण होऊन चालून आले, तर ते करावयाचे, नाही तर स्वस्थ बसावयाचे, हा माझा नित्यक्रम