पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/297

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२७२

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

बाळगली ह्मणजे क्षुद्र विचारांनी मन दुर्बल होत नाही. तसेंच 'परोपदेशे पांडित्यं' असें कधींहि होऊ देऊ नये. आपण जगाचे गुरु नसून शिष्य आहों-चाकर आहों, हे सदोदित ध्यानांत धरिले पाहिजे.

आपला,

विवेकानंद.

पत्र १५ वे.

ता० ६ मे १८९५.

प्रिय--

 आपलें पत्र आणि श्रीरामानुजाचार्यांच्या भाष्याची प्रत आज सकाळीच पावली.

 तेथे येऊन हिंदुधर्मावर हल्ला करणारांशी वादविवाद करावा असे मला वाटत नाही. हिंदु लोक जर यासंबंधी स्वतः उदासीन आहेत आणि ते जर खुशाल घोरत पडले आहेत तर ही त्यांची कामगिरी करण्यावांचून माझें काय खोळंबलें आहे ? हिंदुस्थानांतील लोकांस आपल्या धर्माचा मोठा अभिमान आहे असें ह्मणतां. मग तीस कोटि लोकांपैकी आपल्या धर्मावर होणाऱ्या हल्ल्यापासून त्याचे संरक्षण करण्यास कोणीच तयार होत नाही हे काय ? विशेषतः आपणांस पंडित ह्मणविणाऱ्या व्यक्तींचे हे काम आहे. असे पंडित ह्मणविणारे तेथे शेकड्याने मोजतां येण्याइतके आहेत. हे वाग्युद्ध करण्याचे काम त्यांच्याकडे सोंपवून मला आपले काम करण्यास मोकळा राहू द्या. परक्या लोकांत येऊन आणि हाडांची काडे करून मी येथे काही कार्य करीत आहे. अशा वेळी काही थोडीशी तरी मदत तुह्मीं मला करावयास नको होती काय ? पण हिंदुस्थानाने मला काय मदत केली आहे ? अरेरे ! हिंदुस्थानांतील लोकांइतके देशाभिमान्यशून्य लोक साऱ्या जगांत कोठेहि आढळणार नाहीत.

 उत्तम सुशिक्षित आणि खंबीर मनोवृत्तींचे काही थोडे लोक इकडे पाठवून काही वर्षे त्यांना येथे राहतां येईल, अशी तजवीज जर तुह्मीं कराल, तर आपल्या जन्मभूमीची केवढी मोठी सेवा केल्याचे पुण्य तुह्मांस लाभेल ! हिंदुस्थानाबद्दल प्रेम आणि आदर येथें उत्पन्न झाला तर केवढे मोठे पाठबळ आपणांस मिळेल याची कल्पना तुह्मांस नाही. हिंदु लोक ह्मणजे अर्धनग्न स्थितींतले रानटी लोक आहेत, आणि मारून मुटकून तुमच्यांत सुधारणा केली पाहिजे, अशीच अद्यापि पाश्चात्यांपैकी पुष्कळांची तुमच्याबद्दल कल्पना आहे. ही कल्पना अगदी चुकीची