पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/296

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२७१

पत्र १४ वे.

प्रिय---

 आपलें पत्र आतांच मिळाले. माझ्या कार्यात व्यत्यय आणण्याचा येथे कोणी प्रयत्न केला, तर त्यांत त्यास यश येईल अशी भीति तुह्मी यत्किचिहि बाळगू नका. माझें रक्षण परमेश्वर करीत आहे, तोपर्यंत माझें कोणाच्यानेहि कांहीं वांकडे होणार नाही.

 अमेरिका देशाबद्दल आपणास नीटशी कल्पना करता येणार नाही. हा देश विस्ताराने बराच मोठा आहे. येथील लोकांपैकी बराचसा भाग धर्माविषयी फारशी काळजी न करणारा असा आहे. आपणास ख्रिस्तानुयायी ह्मणविणे हा एक देशाभिमानाचा भाग समजला जात असल्यामुळेच ख्रिस्ती धर्म अद्यापि येथे जीव धरून आहे. आपण तेथील कार्यास झपाट्याने सुरवात करावी. इकडील काळजी नको. वेदांतसूत्रे आणि त्यांजवरील निरनिराळ्या मतांच्या आचार्यांच्या टीका उपलब्ध असतील तितक्या पाठवाव्या.

 मी हिंदुस्थानांत परत येऊन काय करूं ? माझा देह मी परमेश्वराच्या चरणी अर्पण केला आहे. त्याचे कार्य जेथें अधिक प्रमाणावर होईल तीच माझी भूमि. हिंदुस्थानांत येऊन माझ्या कल्पनांस मूर्तस्वरूप देता येईल अशी मला आशा नाही. येथें माझें ह्मणणे ऐकून घेणारे आणि तें पटल्यास त्याप्रमाणे वागण्यास तयार होणारे अनेक आहेत. येथून हालण्याविषयी परमेश्वराचा हुकूम होईल तेव्हां मी येथून दुसरीकडे जाईन. तर आतां मजबद्दल अधिक काथ्याकूट करण्यांत वेळ घालवू नका. कार्यास हळू हळू आणि शांततेने आरंभ करा. विद्यार्थ्यास वेदांत आणि भाष्ये शिकविण्याकरितां एखाद्या मठाची स्थापना शक्य तितक्या लवकर करा. आपण क्षुद्र, आपल्या हातून काय होणार, असल्या दुर्बल विकारांचे वारेंहि आपल्यास कधीं लागू देऊ नका. असल्या हृदयदौर्बल्याने व्यक्तीचे नुकसान तर होतेच, पण ज्या कार्यात तो पडला असेल त्या कार्याचीहि हानि झाल्यावांचून रहात नाही. परमेश्वरावर अत्यंत दृढ-अगदी अढळ-असा विश्वास आणि आपण कोणतेंहि कार्य पार पाडूंच पाहू अशी धमक असेल तरच यश मिळण्याची खात्री.

 आपण सदोदित परमेश्वराजवळ आहों, अशी भावना दृढ करून नेहमी आनंदांत राहावें. आपल्या भावनेपासून कधीहि च्युत न होण्याची पक्की खबरदारी