पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/295

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२७०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.
पत्र १३ वे.

प्रिय---  रोजच्या वागणुकीत धर्माचा काही संबंध येतो याची कल्पनाहि अमेरिकन लोकांना नाही. या बाबतींत हिंदूंना अधिक ज्ञान आहे. पैसा कसा मिळवावा याचे ज्ञान अमेरिकन लोकांस अधिक आहे. यासाठी येथे पाया पक्का करणे हेच मोठे कठिण काम आहे; आणि हे केल्याशिवाय मला येथून हालतां येत नाही. कोणतेंहि काम झाले तरी तें पायाशुद्ध आणि पक्के करावें.

 भगवान् श्रीरामकृष्ण असे होते आणि तसे होते हे लोकांस सांगण्यापासून कांहीं फायदा नाही. त्यांच्या धर्मज्ञानाचा परिचय लोकांस करून दिला तर त्याचा उपयोग अधिक होईल. बाकी जगाची दृष्टि पाहिली तर एखाद्या सद्गुरूच्या तत्वज्ञानापेक्षा त्याने काय काय चमत्कार केले आणि तो कसा राहत होता इत्यादि किरकोळ गोष्टींची त्यांस अधिक आवड असते.

 मोठमोठ्या गोष्टी करण्याबद्दल नुसते बेत करीत बसण्यापेक्षा एखाद्या क्षुल्लक गोष्टीसही एकदम आरंभ करणे अधिक श्रेयस्कर आहे. लहानसहान गोष्टींतहि अनेक अनुभव येऊन आत्मविश्वास वाढतो. यासाठी मोठमोठे बेत करीत न बसतां लहानसहान गोष्टी करण्यास एकदम आरंभ करावा. सदोदित उद्योगरत राहिले ह्मणजे पुढील मार्ग आपोआप दिसू लागतो. कसलाहि गाजावाजा न करितां शांत पण अविरत उद्योग चालू द्या. रोम शहर एका दिवसांत बांधले गेले नाही अशा अर्थाची इंग्रजीत ह्मण आहे तिचा अर्थ हाच आहे.

 ह्मैसूरचे महाराजांस देवाज्ञा झाल्याचे कळले. त्यांच्या मृत्यूने आपला एक आधारस्तंभच नाहीसा झाला आहे. असो. परमेश्वराची मर्जी ! आपल्या मदतीसाठी त्याने दुसऱ्या कोणाची योजना केली असेल!
 मिळाल्यास काही दर्भासनें जरूर पाठवावी.

आपला,

विवेकानंद.