पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/292

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२६७


धर्मसिद्धांतांनी आंखून दिलेल्या मार्गाने चालण्याची ज्यांची ज्यांची तयारी आहे ते सर्व माझेच आहेत.

 माझें नांव मोठे व्हावें, माझी कीर्ति वाढावी या उद्देशाने तुह्मी काहीच करूं नका. मोठ्या नांवापेक्षा माझ्या कल्पना मूर्तरूपाने पाहण्यांत मला अधिक संतोष होईल. आजपर्यंत पुष्कळांच्या हातून अशीच चूक झाली. लोकांस सन्मार्ग दाखविण्याच्या बुद्धीनें उपदेश करण्यास प्रथम सुरवात करावी. नंतर लोकांत नांव जरा मोठे होऊ लागले ह्मणजे कीर्तीच्या पाठीस लागून तत्वविचार सोडून द्यावा. असेंच आजपर्यंत अनेकांच्या हातून झाले आहे. ह्मणजे धान्य गेले आणि भूस राहिले असे झाले आहे. भगवान् श्रीरामकृष्णांच्या शिष्यांनी असली चूक होऊ देऊ नये. कोणाचेंहि नांव मोठे करण्याकरितां नव्हे, तर त्याच्या मतांचा प्रसार करण्याकरितां खटपट केली पाहिजे.
परमेश्वर आपणांस सुखी ठेवो.

आपला,

विवेकानंद.

पत्र ११ वे.

ता० १७ फेब्रु० १८९५.

प्रिय---

 देहपात होण्याची वेळ आली तरी आपल्या कार्यक्रमांत व्यत्यय येऊ द्यायचाच नाही असली भगिरथाच्या निश्चयाची माणसे मला हवी आहेत. यश अथवा अपयश हा प्रश्न आपला नाही. आपल्या कार्याचे पर्यवसान वाटेल तें होवो. निश्चयाने कार्य करणे येवढेच आपले काम, असे समजणारी माणसे मला हवीत. तसेंच आपल्या कार्यात सोंगढोंग वगैरे काही उपयोगी नाही. जे काही करावयाचें तें चवाठ्यावर उभे राहून करावयाचे. माझें कार्य अशा रीतीने चाललें तरच करावयाचें: नाहीपेक्षा त्याची कल्पनाच सोडावी हे मला अधिक प्रशस्त वाटते.

 सध्याच्या स्थितीत अत्यंत बिकट अशा कामाला आपण हात घातला आहे. आणि जो जो त्याचा परीघ विस्तृत होत जातो, तो तों तें अधिकच कठीण होत जाते.

 सध्या मला बरेच दिवस विश्रांति मिळाली तर पाहिजे आहे. तथापि इंग्लंडांत जाणेहि फार लांबणीवर टाकितां येत नाही. असो. धीराधीराने सर्वकाही