पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/288

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२६३


-यास पत्र लिहून आपल्या कार्याची रूपरेखा त्यास कळविली आहे, ती तुलाहि समजली असेलच. तर आतां तुमच्यांत काय कर्तबगारी आहे ती दिसू द्या. भाटासारखी बडबड आतां पुरे झाली. आतां या पुढे सर्व बडबड कृतींत उतरविली तरच तिचा उपयोग. हिंदु लोकांनी पुष्कळ सभा भरवून मोठी व्याख्याने दिली, आणि कृतीत कांहीं नाहीं अशी स्थिति झाली तर तुमच्या वायफळ बडबडीकडे कोण लक्ष्य देणार ! बोलण्याप्रमाणे कृति नसेल तर असला मनुष्य कोणाच्याहि मदतीस पात्र नाही. माझें कार्य ह्मटले ह्मणजे सत्यमार्गांचा उपदेश करणे एवढेच. त्याला हिंदुस्थान काय आणि अमेरिका काय, सारखेच!

 माझी अथवा तुझी कोणी निंदा अथवा स्तुति केली तर दोहींकडेहि तूं लक्ष्य देऊ नको. सिंहासारख्या निधड्या छातीने कार्य करीत रहा, ह्मणजे परमेश्वरराचा तुला आशीर्वाद मिळेल. मरेपर्यंत मी माझें कार्य करीत राहीन आणि हा देह पडल्यानंतरहि जगाच्या बऱ्यासाठी मी उद्योग करीन. सत्य आणि सद्गुण स्वतःच असे जड बुडाचे आहेत की, त्यांच्या आधाराने तुला दुसऱ्या कशाच्या मदतीशिवाय आपलें कार्य करितां येईल. त्यांच्या प्रसाराच्या आड कांहीं आलें तर केवळ आपल्या वजनाने त्याचा चक्काचूर उडविण्यास ते समर्थ आहेत.

 येथे हजारों लोक माझ्याबद्दल काळजी वाहणारे आहेत, ही गोष्ट तुला ठाऊकच आहे. सर्व वर्तमानपत्रांनी गिल्ला केला तरी त्याचा कांहीं परिणाम होणार नाहीं इतके महत्व येथे मला हळू हळू प्राप्त होत आहे.

 जोपर्यंत माझें अंतःकरण पवित्र आहे आणि माझें कार्य सत्यासाठी आहे, तोपर्यंत माझें काडीमात्र नुकसान करण्यास कोणीहि समर्थ नाही. माझें चित्त शुद्ध असेपर्यंत मला कशाचीहि भीति नाही हे विसरूं नको. नुसत्या पुस्तकी ज्ञानाच्या प्रदर्शनाने जनतेवर कधींहि खरें वजन पडत नसते. आपली उच्च तत्वें ज्या मानाने आपल्या रोजच्या वागणुकीत प्रत्यक्ष दिसू लागतात त्या मानाने आपणांबद्दल लोकांचा आदर व पूज्यभाव वाढत जातो. लोहचुंबका शेजारी लोखंड ठेविलें तर ते जसें अपरिहार्यपणे लोहचुंबकाकडे धाव घेते तसेंच उच्च तत्वें ज्याच्या कृतींत मूर्तरूपाने दिसू लागली आहेत, त्याजकडे सामान्य जनतेची मनें आपोआप आकर्षण होत असतात. तर ही तत्वे आपल्या अंगी निदर्शनास येतील अशा उद्योगास लागा. उच्चतत्वांच्या प्रत्यक्ष आचारास सुरुवात करा. तुमच्या नुसत्या वटवटीचा आतां मला मनापासून कंटाळा आला आहे. घटका गेली, पळे गेली, असें करतां करतां काळ आपणास केव्हां गट्ट करील याचा काही नेम