पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/287

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२६२

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

स्वतःला आतां परमेश्वराच्या आधीन केले आहे. तो सांगेल तेथें कार्य करीत रहावयाचे इतकेंच माझें काम.

 संपत्तीच्या शोधांत त्रिखंड भटकत असतां, परमेश्वरा, तुजसारखें बिनमोल रत्न मला लाभले. तुझ्यासाठी माझ्या सर्वस्वाचा मी त्याग करितो.

 कोठे तरी खरें प्रेमस्थान असावें ह्मणून भटकतां भटकतांअखेर तूं सांपडलास. परमेश्वरा, 'तूं माउलीहून मायाळ । चंद्राहुनी शीतळ । पाण्याहून पातळ । अससी कल्लोळ प्रेमाचा ॥ आतां दुजी तुज उपमा । काय देऊ पुरुषोत्तमा । ओवाळोनि तुझिया नामा । वरुनि टाकितों॥' माझ्या मित्रा, परमेश्वर सदैव तुला सुखी ठेवो.

आपला,

विवेकानंद.

पत्र ९ वें.

शिकागो,

ता० ११ जानेवारी १८९५.

प्रिय---

 तुमचे पत्र आतांच मिळाले. जगांतील सर्व धर्मापेक्षां ख्रिस्ती धर्म श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याकरितां सर्व धर्माची परिषद भरविण्याची कल्पना अमेरिकेंत निघाली. परंतु तात्विक हिंदुधर्माच्या इमारतीस या सभेमुळे यत्किंचिहि इजा झाली नाही. डॉक्टर बी-अथवा त्याच्याच जातीचे इतर अनुदार मताचे लोक यांजपासून आपण कसल्याच मदतीची अपेक्षा करूं नये हे बरें. परमेश्वराची इच्छा असली तर येथे मला पुष्कळ स्नेही मिळतील; किंबहुना हल्लीहि रोज मिळत आहेत. परमेश्वर त्यांचे बरें करो.

 बोस्टन आणि न्यूयॉर्क यांच्या दरम्यान हल्ली माझ्या बऱ्याच फेऱ्या सुरू आहेत. या देशांत ही मोठी प्रसिद्ध शहरे आहेत. यांपैकी बोस्टन हे सरस्वतीचें आणि न्यूयॉर्क जें लक्ष्मीचे निवासस्थान आहे. या दोन्ही ठिकाणी माझें कार्य माझ्या कल्पनेपेक्षांहि अधिक फलद्रूप झाले आहे. वर्तमानपत्रे माझ्याबद्दल काय ह्मणतात इकडे मी लक्ष्य देत नाही. यासाठी वर्तमानपत्रांतील उतारे तुह्मांस पाठविण्याचे माझ्याने होणार नाही.