पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/286

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२६१

प्राचीन ऋषींनी दाखविलेल्या मार्गाने नवजीवन द्या. तुमचे पूर्वीचे काही टाकून द्या असें माझें मुळीच सांगणे नसून पूर्वीचा मार्ग पत्करा असें माझें सांगणे आहे. मुसलमानांनी साऱ्या जगभर धुमाकूळ माजविला व त्याची एक लाट आह्मांकडे आली, त्यावेळी आम्हास उत्क्रांत होण्यास-आमची वाढ करण्यास-अवकाशच नव्हता. अधिक चांगलें कसें व्हावं हा तेव्हां प्रश्न नसून जगावें कसें इतकाच विचार तेव्हां कर्तव्य होता. आतां ती परिस्थिति साफ बदलली आहे. तेव्हां आतां पूर्वीच्या मार्गाने चालून एकेक पायरी पुढे गेले पाहिजे. सध्यांच्या धर्ममार्तडांनी आंखून दिलेल्या मार्गाने समाजाचा नाश होणार हे उघड दिसत आहे. तर तो सोडून त्यांच्याहून अधिक वंदनीय व पूज्य अशा ऋषिप्रणीत मार्गाचे अवलंबन आपण पुन्हा करूं या.

 सध्या जो आमचा समाज अगदी मोडल्यासारखा व बेडौल दिसत आहे, याचे कारण त्याची इमारत अद्यापि पूर्णपणे बांधली गेली नसून अर्धवट स्थितीत राहिली आहे हे होय. ताजमहालासारखी इमारत बांधिली जात असतां अर्धवट स्थितीत कोणी पाहिली तर तिच्या समग्र, सौंदर्याची कल्पना पाहणाराच्या मनांत कितपतशी उतरेल बरें ! तीच इमारत पूर्ण झाली ह्मणजे प्रेक्षकांच्या हृदयास तल्लीन करून सोडणारी होते. तसेच आमच्या समाजाची इमारत सध्याच्या अर्धवट स्थितीतून निघून पूर्णावस्थेस पोहोंचली म्हणजे सर्व भाग आपआपल्या जागी यथोचित बसून एकंदर इमारतीस अपूर्व शोभा प्राप्त होईल. आमच्या समाजाच्या भावी इमारतीचा माझ्या दृष्टीप्रमाणे दिसणारा नकाशा आज मी तुह्मांपुढे मांडिला आहे. हा नकाशा बरोबर आहे अशी माझी स्वतःची खात्री आहे.

 प्रत्येक राष्ट्राच्या उन्नतीचे वेगवेगळे मार्ग आंखलेले असतात. भारतीय राष्ट्राच्या उन्नतीचा पाया म्हटला ह्मणजे धर्म हा होय. या पायावर तुह्मी पुढील इमारत रचण्यास आरंभ करा, ह्मणजे ती चिरस्थायी होईल. माझ्या मुख्य हेतूच्या सफलतेसाठी मी आंखलेल्या मार्गापैकी एक तुह्मांस आज सांगितला आहे. माझ्या जन्मभूमीच्या बऱ्यासाठी खटपट करणे माझें कर्तव्य आहे; तरी सांप्रत येथेंहि मला माझें उद्दिष्ट कार्य करावयाचे आहे. विशेषतः हिंदुस्थानांतील माझ्या कार्यासाठी ज्या मदतीची मी अपेक्षा करीत आहे, ती मदत मला फक्त येथेच मिळेल असे वाटते. यासाठी आतां माझ्या कार्यास तेथे तुह्मी सुरुवात करा. मी