पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/284

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२५९


वाईट तर नाहीच नाही. उलट ती फार चांगली आहे असें माझें मत झाले आहे. ती आहे याहून अधिक चांगली करण्याचाच प्रयत्न आह्मांस आतां करावयाचा आहे. पूर्वीची चूक आतां सुधारावयाची अथवा पूर्वीच्या पातकांचे आतां निरसन करावयाचे असा प्रकार नसून पूर्वी केलेल्या चांगल्या गोष्टींहून अधिक चांगल्या गोष्टी करावयाच्या. पूर्वीचा सत्यमार्ग अधिक उज्ज्वल करावयाचा अशासाठीच आमचे प्रयत्न आहेत. माझ्या देशबांधवांनी पूर्वी काही चुका केल्या असे नसून समाजसंस्कृतीची घटना त्यांनी उत्तम रीतीने केली आहे असें माझें मत मी त्यांस खुल्या दिलाने जाहीर करतो. आतां याहून अधिक चांगली कृति करून दाखवा एवढेच त्यांस माझे सांगणे आहे.

 आपण जातिभेदाचेच उदाहरण घेऊ. जाति हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ 'उत्पन्न झालेलें' असा आहे. आतां सृष्टि कशी निर्माण झाली-उत्पत्ति कशी झाली-याचा विचार केला पाहिजे. याबद्दल श्रुति सांगते की ‘एकोऽहं बहुस्याम्।' ह्मणजे सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी ब्रह्म 'एक-अद्वितीय' होते, तें सृष्टीनंतर अनेकशः झाले. 'एकम्' ही स्थिति सृष्टीच्या पूर्वीची आहे. ब्रह्म अनेकशः विभागले जाणे -विचित्रता दिसू लागणें-ह्मणजेच सृष्टि उत्पन्न होणे. जर ही विचित्रता-विविधता -भेद-नाहीसे झाले तर सृष्टीच नाश पावेल हे उघड आहे.

 जोपर्यंत कोणताहि मानवसमूह जिवंत असून उत्क्रमण स्थितीत आहे, तोंपर्यंत त्यांत विविधता-विचित्रता-उत्पन्न व्हावी हे सृष्टिनियमास अनुसरूनच आहे. तोच समूह अशी विविधता-विचित्रता-जातिभेद-निर्माण करण्यास असमर्थ असा दिसू लागला तर तो मृत्पिड होण्याच्या मार्गास लागला, असें खचित समजावें.

 समाजांतील प्रत्येक व्यक्तीस स्वतःच्या निरनिराळ्या परिस्थितीप्रमाणे निरनिराळ्या मार्गाने उत्क्रांत होण्यास अवकाश सांपडावा या हेतूनें जातिभेदाची कल्पना उत्पन्न झाली. यामुळे प्रत्येकास आपल्या प्रकृतीस अनुरूपजातीस अनुसरून-अशी स्वतःची वाढ करण्यास अवकाश सांपडला. या तत्वास अनुसरून चाललेल्या समाजांत जातिभेदाची कल्पना हजारों वर्षे जीवंत राहिली हे युक्तच आहे. श्रतिस्मृतींचा विचार केला तर निरनिराळ्या जातींत रोटीबेटी व्यवहाराला आडकाठी आहे असे दिसून येत नाही. तर मग भरतभूमीच्या अवनतीस सुरुवात केव्हां व कशी झाली, हा प्रश्न उपस्थित होतो. ज्या वेळेस जातिभेदाची ही मूळ कल्पना लुप्त झाली तेव्हां हिंदुसमाज मृतप्राय होण्याच्या