पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/283

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२५८

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


पत्र ८ वै.

शिकागो, ता. ३ जानेवारी १८९५.

प्रियमित्र-यांस.

 मी तुह्मांस पत्र लिहावयास बसलों तेव्हां तुमची आठवण होऊन प्रेम आणि कृतज्ञता यांनी माझें हृदय भरून आले. धर्मतत्वांविषयी ज्यांची श्रद्धा कांहीं तरी पक्की झाली आहे, अशांपैकींच तुह्मी आहां, याबद्दल माझी खात्री झाली आहे. श्रद्धा, प्रेम इत्यादि अंतःकरणाचे सात्विक गुण आणि तत्वज्ञान यांच्या संयोगाचा सुंदर परिपाक तुमच्या ठिकाणी झाला आहे. विशेषतः धर्मतत्वांना कृतीत मूर्तस्वरूप कसे द्यावें याची हातोटी तुह्मास चांगली साधली आहे. जें कांहीं करावयाचें तें शुद्ध अंतःकरणाने व श्रद्धेने करावयाचे अशी तुमची वृत्ति असल्यामुळे माझें हृदय तुमच्यापाशी आज उघडे करावे असे मला वाटते.

 हिंदुस्थानांत धर्मजागृति थोड्याबहुत प्रमाणावर सुरू झाली आहे; परंतु ती आतां येथेच थांबतां उपयोगी नाही. आतां यापुढे तिचे प्रमाण वाढतें राहील, अशा प्रकारचे उद्योग आपण सुरू केले पाहिजेत. बरेच दिवस विचार करून माझें जें कांहीं मत झाले आहे, तें मी आपणास कळवितो. धर्मसंबंधी शिक्षण देणारे एखादें कॉलेज मद्रासेंत स्थापून त्याचे कार्यक्षेत्र हळू हळू वाढवावें. हिंदुस्थानांतील तरुण पिढीस वेदांतधर्माचे तात्विक ज्ञान उत्तम रीतीने मिळण्याकरितां प्रस्थानत्रयी आणि तीवरील प्रमुख आचार्यांची भाष्ये यांचा सांगोपांग अभ्यास तरुणांकडून करविला पाहिजे. तसेंच जगांतील इतर धर्म आणि तत्वज्ञान यांचा अभ्यासहि त्याबरोबरच चालू ठेवणे श्रेयस्कर होईल. अशा प्रकारच्या कॉलेजामार्फत तत्वज्ञानविवेचक असे एखादें पत्र अथवा मासिक पुस्तकहि सुरू केल्यास चांगले. अशा प्रयत्नाचा आरंभ अगदी लहान प्रमाणावर झाला तरी त्यापासून पुढे मोठी कार्ये खचित निर्माण होतील. आमचे प्राचीन तत्वज्ञान आणि सध्याची पाश्चात्य जागृति यांचे प्रमाणबद्ध मिश्रण सध्या मद्रासेंत दृष्टोत्पत्तीस येऊ लागले आहे.

 आमची सध्याची समाजरचना आमूलाग्र बदलली पाहिजे, हे सध्याच्या सुशिक्षितांचे मत मलाहि ग्राह्य वाटते. परंतु हे करावयाचें कसें ? या दृष्टीने सुधारकांनी 'मूले कुठारः' ह्मणून जे मोडतोडीचे प्रयत्न केले ते सपशेल फसले आहेत. समाजरचना नियमबद्ध करण्याकरितां ज्या काही गोष्टी आह्मीं पूर्वी केल्या त्या वाईट आहेत असे मला मुळीच वाटत नाही. आमची समाजरचना