पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/282

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२५७

अनाठायीं नव्हता असे सिद्ध करून दाखवा. तुमच्या प्रत्येक पावलाबरोबर मी चालत आहे हे ध्यानांत धरा. तुह्मी कोठेही असलां आणि कांहींहि करीत असलां तरी माझी दृष्टि तुमच्यावर आहे. प्रत्येकाशी शांतवृत्तीने वागत जा.

 हिंदुस्थानांत इतक्यांतच परत येण्याचा माझा बेत नाही. येथे होत असलेल्या धर्मजागृतीस काही तरी चिरस्थायित्व यावे अशा दृष्टीने मी सध्या येथे काम करीत आहे. अमेरिकन लोकांचा माझ्यावर. दिवसेंदिवस अधिक विश्वास बसत आहे. साऱ्या जगांत जागृति उत्पन्न करण्याची महत्वाकांक्षा बाळगणारांनी आपली दृष्टि जगद्व्यापी केली पाहिजे. तसेच आपल्या इच्छा व आशा बारिकसारीक गोष्टींत गुंतून न राहतां साऱ्या जगाच्या हिताचा विचार करितील इतक्या उदार केल्या पाहिजेत. संस्कृताचा अभ्यास सुरू असूं दे. विशेषतः वेदांतावरील प्रमुख तीन आचार्यांच्या भाष्यांचा तरी अभ्यास उत्तम केला पाहिजे. आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी अनेक मी विचार करीत आहे. यासाठी आतां तुह्मींही कंबर बांधून तयारी केली पाहिजे. माझ्या मुला, व्याख्याता होण्याची तुझी इच्छा असली तर त्या कलेचा विशेष अभ्यास करून लोकचित्ताकर्षक असा वक्ता तुला बनले पाहिजे. तूं कोणतीहि गोष्ट पक्क्या आत्मश्रद्धेनें व भक्तीने केलीस तर त्यांत अवघड असें कांहींच नाही, हे तुझ्या प्रत्ययास येईल. सर्वांना माझें हेच सांगणे आहे. माझे सर्वच गुरुबंधु असे श्रद्धावान् आहेत की, त्यांचे कार्य पाहून सारे जग थक्क होईल, अशी कृति करण्यास ते कधीहि मागे घेणार नाहीत अशी माझी खात्री आहे.

 तुह्मीं आरंभ चांगल्या रीतीने केला आहे. आतां एखाद्या अडचणीने हताश न होतां व आत्मविश्वास ढळू न देतां अखंड कार्यव्यापृत राहणे, हेच तुमचे काम आहे. तें तुह्मीं केलेंत ह्मणजे त्याची सुंदर फळे दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणावर तुमच्या नजरेस येतील.

 कोणत्याहि गोष्टीविषयी लोकांबरोबर वादविवाद करण्याच्या भरीस पडूं नका. अशा रीतीने अकारण शत्रु उत्पन्न करण्यांत फायदा नाही. अमकातमका ख्रिस्ती झाला ह्मणून वाद उपस्थित करून रणे माजवावी यांत अर्थ काय ? असल्या वादाच्या फंदांत आपण पडूं नये. परधर्मसहिष्णुता हा आह्मा हिंदूंचा जातिस्वभाव आहे. तो सदोदित अंगी बाळगून शांतवृत्तीने आणि चिकाटीने काम केलें ह्मणजे यश शेवटी येणारच येणार.

आपला,

विवेकानंद .

स्वा. वि. १७