पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/281

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खरोखर एखाद्या सार्वजनिक संस्थेचा प्रमुख होण्यास लायक असतो. जिवावर बेतले तरी आत्मविश्वास-श्रद्धा-सोडूं नको. आपणास पैशासाठी अथवा मोठेपणाच्या कीर्तीसाठी काम करावयाचें नाहीं. मद्रासमध्येच काही पैसा या कार्यासाठी मिळविण्याची खटपट करा. तुमची वृत्ति खरोखर 'वसुधैव कुटुंबकम् ' अशी झाली, ह्मणजे यश हे ठेवलेलेच.

 आपल्या कार्यपूर्तीसाठी धडाडून पेटलेल्या आगीत उडी घालण्याची वेळ आली तरी पाऊलहि मागे घेणार नाही, अशी माणसे मला हवी आहेत. सध्या कामास सुरुवात करा. तात्विक वादविवाद करण्यास पुढे पुष्कळ वेळ मिळेल. अंतःकरणाचें पावित्र्य, धीरवृत्ति आणि दृढनिश्चय एवढ्या भांडवलावर उद्योगास सुरुवात करा.

 मी हिंदुधर्मासंबंधी सध्या कांहीं पुस्तक लिहीत नाही. धर्मसंबंधी सुचणारे काही विचार नुसते टांचून ठेवण्याचे काम मी सध्या करीत आहे. हे विचार पुस्तकरूपाने प्रसिद्ध करावे की काय, याबद्दल माझा निश्चित असा कांहींच बेत नाही. कवडीमोल असे भाराभर ग्रंथ जगांत अगोदरच नाहीत काय ? त्यांत आणखी एकाची भर कशाला हवी? धर्मप्रसारासाठी एखादें मासिक सुरू केले तर त्याने अधिक चांगले कार्य होईल. त्यांत नेहमी निश्चयात्मक पद्धतीने लिहीत जा. तुमच्या लेखावरून प्रतिपाद्य विषयाचा निश्चित बोध झाला पाहिजे. तसेंच दुसऱ्यावर टीका करण्याच्या फंदात पडूं नये हे चांगले. जे कांहीं तुला जनांस सांगावें असें वाटेल, तें सांगून मोकळा हो. तें लोकांस पटते की नाही वगैरे विचार करण्याच्या भानगडींत तूं पडूं नको.

 वर्तमानपत्रांतले उतारे यापुढे मला तूं पाठवीत जाऊ नको. त्यांतील निंदास्तुतीकडे लक्ष्य न पुरविण्याचा मी निश्चय केला आहे. येथेंहि निंदाप्रचुर लेखास उत्तर न देण्याचा माझा निश्चय आहे. माझ्या कार्याची त्यामुळे हानी होणार नाही हे मला पक्के ठाऊक आहे.

 जर तुह्मी खरोखर माझी मुले असाल तर आतां पाउलभरहि मागे न यता कामास सुरुवात करा. सिंह जसा निधड्या छातीने शत्रूवर तुटून पडतो तसल्याच छातीने तुह्मीं कार्यास लागले पाहिजे. हिंदुस्थानांतच काय, पण साऱ्या जगांत आपणांस जागृति उत्पन्न करावयाची आहे. आतां तुह्मांस कार्यास लागलेच पाहिजे. नकाराची भाषाहि आतां यापढें बोलू नको. देहपातापर्यंत गुरूचा हुकूम पाळणे, हीच खरी गुरुभक्ति. ती तुमच्या अंगी आहे काय ? तुमच्या अंगी ती आहे असे मला मनापासून वाटते. तर आतां उठा, आणि माझा विश्वास