पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/280

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२५५

उत्तर कां दिले नाही. ? " वृद्ध ह्मणतो, " बाबा, तुला खरेंच त्या गांवास जावयाचे आहे असे मला तुझ्या विचारण्याच्या पद्धतीवरून वाटले नाही. तूं खरोखरच जावयास निघालास तेव्हां तुला योग्य मार्ग दाखविणे मला भाग पडलें."

 माझ्या मुला, ही गोष्ट तूं सदोदित लक्ष्यांत बाळग. तूं मनापासून कामास आरंभ केलास की तुला मार्गदर्शक भेटेलच भेटेल. 'अनन्याश्चिंतयंतो माम् ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥१॥' असें भगवान् श्रीकृष्णांनी गीतेत वचन दिले आहे. ते सत्य आहे, हे नेहमी लक्ष्यांत ठेव. हे वचन ह्मणजे स्वप्नांत दिलेले वचन असे समजू नको.

 लोकांस खऱ्या धर्ममार्गाचा उपदेश करणे व अडचणीच्या प्रसंगी कायावाचामनाने त्यांच्या उपयोगी पडणें हें सांप्रतचे तुमचे कर्तव्य आहे. दर आठवड्यास एकत्र जमण्यासाठी एखादी लहानशी जागा घेऊन तेथे उपनिषदादि धर्मग्रंथांचें सटीक वाचन सुरू करा. अशा रीतीने आत्मशिक्षण आणि परसेवा ही एकत्र चालूद्या. तुह्मीं काम करण्यास सुरुवात केली ह्मणजे सर्व सुरळीत चालू लागेल. -बद्दल ह्मणशील तर तो लवकर विकारवश होतो. तूं शांतवृत्तीचा आहेस, यासाठी तुझी दोघे एकत्र काम करा. कांही करावयाचे असले तर ते मनापासून करावयाचे अशी वृत्ति सदोदित असावी.

 कोणत्याहि व्यक्तीला काय अथवा राष्ट्राला काय, आपली उन्नति व्हावी असें वाटत असेल, तर त्याने स्वतःच कंबर बांधून उद्योगास लागले पाहिजे. खऱ्या हिंदुधर्माचे पुनरुज्जीवन करण्याकरितां अमेरिकेंतून पैशाची अपेक्षा करणे ह्मणजे मृगजळानें तहान भागविण्यासारखेच आहे.

 मद्राससारख्या एखाद्या शहरी तुम्ही आपला मुख्य मठ करा. असा मध्यवर्ती मठ असणे कोणत्याहि कार्यास फार अनुकूल असते. अशा मध्यबिंदूपासून उत्साहवर्धक ज्ञानकिरण सर्वत्र पसरूं द्या. आरंभ अगदी लहानशा प्रमाणावर असला तरी हरकत नाही. प्रथम अगदी थोडी माणसें असली तरी एकवेळ कार्यास आरंभ केला ह्मणजे तुमच्या कार्यास आपले आयुष्य वाहणारे दुसरे अनेक मिळतील. अशा कार्यात प्रमुखत्वानें काम करणाऱ्या व्यक्तीने एक गोष्ट मात्र सतत लक्ष्यांत बाळगिली पाहिजे. ती ही की, दुसऱ्यावर अंमल गाजविण्यासारखी कोणतीहि गोष्ट त्याने करूं नये. आपण प्रमुख असलो तरी इतरांसारखेच एक सामान्य मनुष्य आहो असे इतरांस वाटण्यासारखें त्याने आपले वर्तन ठेविलें पाहिजे. ज्याला परसेवेचे तत्व उत्तम रीतीनें अवगत झाले आहे, तोच मनुष्य