पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/278

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२५३

आणि ह्मणूनच माझें कंगाल मनुष्यांवर प्रेम असणे साहजिक आहे. या देशांतील गरीब लोक आणि त्यांच्या बऱ्याकरितां खटपट करणारे हे माझ्या अवलोकनांत येत आहेत. आमच्या हिंदुस्थानची स्थिति येथील स्थितीशी ताडून पाहतां केवढे अंतर दिसू लागतें ! दारिद्र्यांत आणि अज्ञानपंकांत रुतून गेलेल्या कोट्यवधि लोकांची यत्किंचित् तरी काळजी वाहणारे हिंदुस्थानांत किती लोक आहेत ? घरोघर फिरून त्यांस ज्ञानदान करणारा कोणी हरीचा लाल आहे काय ? गाढ अंधकारांत प्रकाशाचा एक किरण तरी त्यांस पोहोचविण्यास कोणी तयार आहे काय ? निदान मनाने तरी त्यांच्या बऱ्यासाठी चिंतन करणारा कोणी आहे काय ? ज्यांची आजपर्यंत सर्वत्र उपेक्षा झाली आहे, अशा रंजल्यागांजलेल्यांस तूं आपले ह्मण, त्यांच्या बऱ्यासाठी प्रार्थना कर आणि सुचेल तें काम करण्यास सुरुवात कर, ह्मणजे परमेश्वरच तुझा वाटाड्या होईल. 'जे का रंजले गांजले । त्यांसि ह्मणे जो आपुले । तोचि साधु।' तोच महात्मा; आणि इतर साधूसारखे दिसणारे लोक दुरात्मे होत! परमेश्वराचे स्मरण करून आपण सारेच उद्योगास लागू या. आपल्या कृतीला दृश्य फळ कदाचित् लवकर येणार नाही. आपल्याकरितां कोणी आनंदप्रदर्शक सभा भरविणार नाही; फार काय, आपण मृत्युवश झालों तर आपणाकरितां एक अश्रुढाळणाराहि कोणी मिळणार नाही. पण असे झाले तरी आपली कृति फुकट गेली, फलहीन झाली असें तुला वाढू देऊ नको. कृतीच काय, पण मनांत उद्भूत झालेला एक विचारहि फुकट जात नाही हे लक्ष्यांत ठेव. लवकर अथवा उशिरां त्याचा परिणाम झालाच पाहिजे. मित्रा, माझें अंतःकरण आतां अगदी भरून आले आहे. माझ्या अंत:करणांतील विचार व्यक्त करण्याचे सामर्थ्य शब्दांत नाही. परंतु तुला सर्व ठाऊक आहेच; आणि कल्पनेनें तें तुला जाणतां येते. माझे कोट्यवधि बांधव निरक्षर आणि बुभुक्षित असतां त्यांच्याच खर्चाने सुशिक्षित होऊन त्यांची यत्किंचिहि काळजी न करणाऱ्या प्रत्येक मनुष्यास मी देशद्रोही-बंधुद्रोही समजतो. भकेने कंठाशी प्राण आलेल्या माझ्या बांधवांकरितां यत्किचिहि काळजी न करतां नटून सजून कोंबड्याप्रमाणे छाती वर करून चालणाऱ्यांस धि:कार असो. प्रियबंधु, आपण भिकारी आहों, अगदी क्षुद्र आहों, ही गोष्टी खरी; परंतु आपण 'मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरीम्।' अशाचे चाकर आहों, हे विसरूं नको. ईश्वर तुह्मा सर्वांचे कल्याण करो.

आपला,

विवेकानंद