पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/277

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२५२

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

आहे. आपण अशा प्रयत्नांस सुरुवात केली आहे, या विचारांतच सध्या आपण आनंद मानिला पाहिजे. 'देहं वा पातयेत् अर्थं वा साधयेत् ' अशा प्रकारची श्रद्धा, अंतःकरणाचे पावित्र्य आणि कामाची शिकस्त इतकी तयारी तुझ्याजवळ जय्यत पाहिजे. भगवान् रामकृष्णांच्या शिष्यवर्गात काही विशेष गुण ह्मटला, तर खरें अंतःकरण हा पाहिजे. असली शंभर माणसे मला मिळाली व ती मी दर्शविलेल्या मार्गानें कार्य करूं लागली, ह्मणजे माझें कर्तव्य संपलें असें मला वाटेल व समाधानाने हा देह ठेवण्यास मी तयार होईन. परमेश्वराची मर्जी असेल तर तसे होईल ! अज्ञ लोकांनी तुझ्याविरुद्ध कितीहि बडबड केली तरी त्यांच्या ह्मणण्याकडे तूं लक्ष्य देऊ नको. आपण कोणाकडून मदतीची अपेक्षा करूं नये; पण ती चालून आली तर तिचा त्यागहि करूं नये. आपण भगवंताचे पट्टेवाले आहों, हे विसरता कामा नये. क्षुद्र कीटकांनी त्रास देण्याचा यत्न केला तर त्याकडे उपेक्षा दृष्टीने पहावें. पुढे, एकसारखें पुढे चला. सत्यमार्गातला एक शब्दहि फुकट जात नाही. राखेच्या दडपणांत अग्नि जसा गुप्त राहतो, तसा तो शब्द कदाचित् युगानुयुगेंहि गुप्त राहील; परंतु त्यांतील प्रखरता यत्किंचिहि कमी होणार नाही. त्याचा प्रकाश पडण्याची वेळ केव्हांनाकेव्हां तरी येईलच. सत्य, सद्गुण आणि पावित्र्य ही आत्म्याप्रमाणेच अच्छेद्य आणि अदाह्य आहेत. खऱ्या अंतःकरणानें काम करणारा एकहि मनुष्य मला पुरे. खोगीर भरतीची हजारों मनुष्ये माझ्या कामाची नाहीत. माझ्या मुला, तूं आपल्या कर्तव्याला पक्का चिकटून रहा. तुझा पाठीराखा परमेश्वर असतां, व तो तुला मदत देण्यास तयार असतां मनुष्यांच्या मदतीची इच्छाच तूं करूं नयेस. जोपर्यंत तुझ्या अंतःकरणांत आत्मविश्वास पक्का आहे आणि परमेश्वरावरचा तुझा भरंवसा पक्का आहे, तोपर्यंत तुझा मार्ग सरळच आहे असें तूं समज. तुझें नुकसान करण्यास कोणीही समर्थ नाही. परमेश्वराला अंत:करणापासून आळव ह्मणजे भोंवतीं गाढ अंधकार पडला असला तरी तुला दीपदर्शन होईल आणि तुझा मार्ग तुला स्पष्ट दिसेल. मी तुझ्या बऱ्यासाठी रोज प्रार्थना करितो तसेंच तूंहि माझ्याकरितां रोज करीत जा. खोटा धर्मबंधनें, जुलूम आणि दारिद्य या त्रिविध तापांनी पोळून गेलेल्या आपल्या कोट्यवधि बांधवांसाठी आपणांपैकी प्रत्येकाने रोज प्रार्थना करीत राहिले पाहिजे. खऱ्या धर्माची जरूरी सध्या श्रीमंत आणि मोठे लोक यापेक्षां माझ्या गरीब बांधवांसच अधिक आहे. मी काही चमत्कार करून दाखविणारा योगी नाही, तत्ववेत्ता नाही आणि साधुहि नाही. तर मी एक अगदी कंगाल मनुष्य आहे,