पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/274

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२४९

आपण आतां पुढील कर्तव्यास स्वतःच्या हिंमतीवरच सुरुवात करा. स्वयंपाक तयार झाला ह्मणजे पंक्तिबारगीर हवे तितके जमतील. आतां काळजीपूर्वक कामास लागा.

आपला,

विवेकानंद.


पत्र ४ थे.

ता. ३० नोव्हेंबर १८९४.

प्रिय के.
 भगवान् श्रीरामकृष्णांनी काय काय चमत्कार केले, हे प्रसिद्ध करणाऱ्या मूर्खाच्या नादी आपण लागू नये. त्या गोष्टी खऱ्या आहेत; पण असल्या मूर्खपणाने चरित्राचा प्रमुख भाग आणि गौण भाग यांचा घोंटाळा मात्र होतो. चमत्कारांसारख्या अप्रस्तुत आणि निरर्थक गोष्टी सांगून काय फायदा ? वास्तविक त्यांनी जो ज्ञानोपदेश केला तोच सांगितला पाहिजे. चमत्कारांनी कोणतेंहि प्रमेय सिद्ध होत नाही. जड गोष्टींनी चैतन्याची सिद्धि होत नाही. परमेश्वराचे स्वरूप आणि अस्तित्व, आत्म्याचे स्वरूप व नित्यता इत्यादि प्रमेये आणि चमत्कार यांचा काही तरी परस्परसंबंध आहे काय ? भगवानांचा ज्ञाननिर्झर लोकांसाठी मोकळा करा. जें ज्ञानामृत पिऊन तुझी तृषा शांत झाली, तेंच ज्ञानामृत इतरांस पाज. चमत्कारांविषयी विचार करून आपला मेंदू व्यर्थ शिणवू नको, आणि असल्या वेडगळ गोष्टी सांगून इतरांसही त्रास देऊं नको.

तुझा,

विवेकानंद.


पत्र ५ वे.

प्रिय
 माझ्यासंबंधीं मिशनरी पत्रांत वेडावांकडा मजकूर लिहिलेला असतो असें कधी कंधी माझ्या कानी येते; परंतु त्याकडे मी कधीहि लक्ष्य देत नाही. हिंदुस्थानांतल्या पत्रांतील असे उतारे तुम्ही मला पाठविले तर त्यांस मी खचित केराच्या टोपलीत टाकीन. आमच्या कार्याकडे लोकांचे लक्ष्य लागावें म्हणून थोडासा गाजावाजा पाहिजेच होता; परंतु आतां त्याचा अतिरेक होऊ देतां उपयोगी नाही. आतां माझी कोणी निंदा अथवा स्तुति केली तरी दोहींकडे तुम्ही लक्ष्य देऊ नये, हे बरें.