पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/273

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४८

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.
पत्र ३ रे

ता० ३० नोव्हेंबर १८९४.

प्रिय-

 धर्मप्रसाराचे काम करण्याकरितां तयार झालेल्या संघाची नियमबद्ध रचना असावी हे चांगले; परंतु ही नियमबद्धता निवळ व्यावहारिक कामांपुरतीच असली पाहिजे. धार्मिक बाबींसंबंधी अशा नियमबद्धतेचा उपयोग केला, तर त्यामुळे नवाच धार्मिक पंथ उत्पन्न होण्याची भीति असते. नवा धर्मपंथ होऊ नये अशाबद्दल आपण खबरदारी घेतली पाहिजे.

 भगवान् श्रीरामकृष्णांचे चरित्र लिहिण्याची कोणास इच्छा असली तर कोणत्या कार्यासाठी ते अवतरले व त्यांनी कशाचा बोध केला हे कळण्याजोगें तें चरित्र पाहिजे नाही तर किरकोळ गोष्टींचे वर्णन करून त्यांच्या चारित्र्याचे भलतेंच स्वरूप लोकांपुढे त्याने मांडूं नये. त्यांचे प्रेममय जीवित, त्यांचे ज्ञान, त्यांचा उपदेश आणि त्यांचा धर्ममय. आयुष्यक्रम ही ज्यांत व्यक्त होतील असें चरित्र के-नें लिहावें. हिंदुधर्माचे वास्तविक स्वरूप काय आहे, हे प्रत्यक्ष स्वरूपानें कळावे, याकरितांच त्यांचा प्रखर जीवितदीप प्रज्वलित झाला होता. शास्त्रांनी जें परोक्ष ज्ञान सांगितले, तेच ज्ञान रोजच्या सामान्य आचरणांत कसें व्यक्त करावें, याचा वस्तुपाठ त्यांच्या आयुष्यक्रमावरून मिळण्याजोगा आहे. पूर्वकाली जे अवतार झाले व अनेक ऋषि उत्पन्न झाले, त्यांचे वास्तविक कार्य काय होते, तें भगवानांच्या चरित्रामुळे आपणांस आज कळण्याजोगे आहे. शास्त्रांतील अव्यक्त ज्ञानतत्वांचें व्यक्तरूप-व्यावहारिक रूप-ह्मणजे श्रीरामकृष्णांचें चरित्र होय. भारतीय राष्ट्रपुरुषाने जें ज्ञान पांच हजार वर्षांत मिळविले, त्याचे व्यक्तस्वरूप ५४ वर्षांच्या आयुरवधींत प्रगट करून भावी पिढ्यांकरितां तो ज्ञानमार्ग भगवान् रामकृष्णांनी प्रकाशित करून ठेविला आहे. व्यक्तीच्या अधिकारपरत्वें ज्ञानमार्गाचे स्वरूप बदलतें असें भगवानांचे मत होते व हे मत आपण लक्ष्यांत ठेविलें ह्मणजे वेद व शास्त्रे यांत परस्परविरुद्ध भासणाऱ्या सिद्धांताची एकवाक्यता होते. परकीयांचा आयुष्यकम आपणांस न पटला तरी त्यासंबंधी केवळ उदासीन न राहतां आपण शुद्ध बंधप्रेमाने त्याच्याशी वागले पाहीजे असें भगवान् ह्मणत असत. आणि सर्व धर्माचा मूलभूत सिद्धांतहि हाच आहे. भगवानांच्या चरित्राची ही रूपरेषा ध्यानांत धरून त्यांचे सुंदर आणि परिणामकारक चरित्र लिहिता येईल. असो; योग्य वेळी सर्व गोष्टी होतील.