पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/272

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२४७

शत्रुत्व हे खरें जीवित आणि परद्वेष हा ठराविक मृत्यु होय. ज्या दिवशी आम्ही परकीयांचा द्वेष करूं लागलों, त्याच दिवशी आमच्या राष्ट्रपुरुषाच्या नाड्या बंद पडण्यास सुरुवात झाली; आणि आतां तो मार्ग सोडून आम्ही परत न फिरलों तर निश्चयाने मृत्यु येणारच.

 भूतलावरील सर्व जातीच्या लोकांशी मिळून मिसळून आम्हांस वागले पाहिजे. यासाठी जो जो हिंदुमात्र परराष्ट्रगमन करितो, तो आपल्या जन्मभूमीचा खरा मित्र आहे. गवताच्या गंजीवरील कुत्र्याप्रमाणे स्वतः खावयाचें नाहीं व दुसऱ्यास खाऊं द्यावयाचें नाही असा बाणा बाळगणारे खुळसट धर्ममार्तड आपल्या मातृभूचे खरे शत्रु होत. ज्या इमारतीकडे पाहून तोंडांत बोट घालावें, असली राष्ट्रीय इमारत पाश्चात्य राष्ट्रांनी सध्याच्या काळी उठविली आहे. उत्कृष्ट दानत असणारी माणसें ही या इमारतीचे आधारस्तंभ आहेत; आणि अशी हजारों-लक्षावधि-माणसें आमच्यांत निर्माण होईपर्यंत या अथवा त्या पाश्चात्य राष्ट्राविरुद्ध गिल्ला करून फळ काय ?

 दुसऱ्यांस स्वातंत्र्य देण्यास जे तयार नाहीत, ते स्वतः स्वातंत्र्यास योग्य आहेत काय ? शांत मनाने आणि खऱ्या मर्दपणाला उचित अशा मार्गाने आपण सारे कामास लागू या. निष्कारण तंटेबखेडे आणि परद्वेष आतां पुरे. जो कोणी ज्या स्थितीत राहण्यास अंगच्या गुणांनी योग्य झाला, त्याला ती स्थिति प्राप्त होऊ न देण्याची शक्ति या साऱ्या विश्वरचनेत कोणाच्याहि अंगीं नाहीं, अशी माझी पूर्ण खात्री झाली आहे. गतकाली आम्ही वैभवशाली होतो हे खरें, पण भविष्यकाळी त्याहूनहि अधिक मोठे आम्ही होणार असें माझें मन मला सांगत आहे. शांतता, धीर आणि अविरत काम करण्याचा उत्साह, भगवान् शंकराच्या कृपेने आम्हांमध्ये सदैव राहो इतकीच माझी प्रार्थना आहे.

आपला,

विवेकानंद.