पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/267

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२४१


विसर पडला आहे, तरी एका काळी तूं पूर्णत्व पावशील आणि त्यावेळी तुझ्या अनंतत्वाचा तुला प्रत्यय येईल.

 वेदांताचे आणखी एक सांगणे असे आहे की अनेक धर्ममार्ग असणे, हेच आपणा सर्वांच्या वाढीस अवश्य आहे. सर्वांना एकाच धर्माचे अनुयायी करण्याचा प्रयत्न करूं नका. प्रत्येकाला त्याच्यापरीने अंतिम साध्य सिद्ध करण्यास मुभा देणे हेच सर्वांस हितकर आहे. सर्वांचे साध्य एकच असल्यावर मार्ग व्यक्तिशः निराळे झाले तरी काय बिघडलें ? वेदांत ह्मणतो ' आकाशात् पतितं तोयं यथा गछति सागरम् । सर्वदेवनमस्कारः केशवंप्रति गच्छति ॥'

 या अत्यंत प्राचीन धर्मामुळेच. बौद्ध धर्माचा उदय झाला. बुद्धाने आपले शिष्य जगभर पाठवून निद्रितांस जागृत केले. वेदांतमताचा ख्रिस्तीधर्मावरहि पर्यायानें बराच परिणाम झाला आहे. मध्ययुगांतील तत्ववेत्त्यांच्या चित्तावरहि वेदांतमताने परिणाम केल्याचे दाखले आहेत. शेवटी शेवटी जर्मन तत्ववेत्त्यांवरहि त्याचा परिणाम होऊन तत्वज्ञांच्या विचारसरणीत बरीच क्रांति घडून आली. अशा रीतीने वेदांतमताचा वस्तुतः साऱ्या जगभर जय झाला असतांहि तें काम अत्यंत शांततेने आणि कोणत्याहि प्रकारचा गाजावाजा न होतां तडीस गेले. रात्रीच्या वेळी वनस्पतींवर पडून त्यांस टवटवी आणणाऱ्या दंवाचा नाद ज्याप्रमाणे कोणासहि ऐकू येत नाही, त्याचप्रमाणे वेदांतधर्माने जगभर पसरून मानवजातीवर उपकार करण्याचे काम अत्यंत शांत आणि अगदी निःशब्द अशा रीतीने पार पाडले. अशोक राजाच्या कारकीर्दीतील कित्येक लेखांवरून बौद्धधर्माच्या प्रसाराचे कार्य कसे चालत असे, याचें अनुमान होते. त्याच्या वेळी चीन, इराण, अलेक्झांड्रिया इत्यादि लांबलांबच्या मुलखांत धर्मोपदेशक पाठविण्यात येत असत. या गोष्टी ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी तीनशे वर्षांवर घडल्या आहेत. 'परधर्मांचा अनादर बुद्धीने उल्लेख करूं नका. सर्व धर्माचें मूळ एकच आहे. तुमच्याकडून होईल तितकी मदत परकीयांस करा. तुह्माला येत असेल तें त्यांस अवश्य शिकवा. पण त्यांना अपकार होईल असें कांहीं करूं नका.' अशा प्रकारच्या आज्ञा त्यावेळी सर्व बौद्ध धर्मोपदेशकांस दिल्या जात.

 वेदांतमताच्या प्रसारामुळेच हिंदुस्थानांत कोणाचाहि धर्मछळ असा झालाच नाही. उलट सर्व धर्माबद्दल हिंदूंच्या मनांत पूज्यबुद्धि उत्पन्न झाली. स्वतःच्या देशास मुकलेल्या यहुदी लोकांना हिंदूंपासून आश्रय मिळाला. मलबार किनाऱ्यावर त्यांचे वंशज आज हयात आहेत. पारसीकांचा छळ झाला तेव्हां त्यांनीहिस्वा. वि. १६